ईडी कारवाईची भीती दाखवून महिलेची फसवणूक; तब्बल 32 लाखांना घातला गंडा
पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. सायबर चोरटे नागरिकांना धमकावून लाखो रुपयांवर डल्ला मारत आहे. फसवणुकीच्या घटनांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसही सतत करत आहे. मात्र फसवणुकीच्या घटना थांबताना दिसून येत नाही. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सक्त वसुली संचनलयाकडून (ईडी) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची ३२ लाख सहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी फेब्रुवारी महिन्यात संपर्क साधला. महिलेच्या नावाने एका कंपनीची नोंदणी झाली आहे त्यांच्या नावाचा गैरवापर करुन (आयडेंटीटी थेफ्ट) एका बँकेत खाते उघडण्यात आले आहे. महिलेच्या बँक खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार करण्यात आला आहे. या प्रकरणात ईडीकडून महिलेविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, अशी भीती सायबर चोरट्यांनी महिलेला दाखविली.
दरम्यान त्यानंतर महिलेच्या बँक खात्याची पडताळणी करण्यात येणार असल्याचे सांगून गोपनीय माहिती घेतली. कारवाई न करण्यासाठी तातडीने पैसे जमावे करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या बँख खात्यात गेल्या सात महिन्यात वेळोवेळी ३२ लाख सहा हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : माकडाने चालत्या दुचाकीवर उडी मारली अन्…; महाबळेश्वर तालुक्यातील धक्कादायक घटना
व्यावसायिकाला 85 लाखांना घातला गंडा
गेल्या काही दिवसाखाली एक फसवणुकीची घटना घडली आहे. संस्थेची जमीन लीजवर देण्याच्या बहाण्याने दोन ठकबाजांनी एका व्यावसायिकाला 85 लाखांना गंडा घातला आहे. या प्रकरणी सदर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये प्रशांत अशोक सतरालकर (वय ५५, रा. कॅथेड्रल कम्पाऊंड, सदर) आणि गौतम ओमप्रकाश सिंग (वय ३५, रा. प्रशांतनगर, गिट्टीखदान अशी आरोपींची नावे आहेत.