चोरटे करोडपती अन् पुणेकर कंगाल; साडेतीन वर्षात तब्बल 73 कोटींचा ऐवज लंपास
पुणे/अक्षय फाटक : सुरक्षित म्हणवणाऱ्या पुण्याची चिंता दिवसेंदिवस वाढत असून, पै-पै जमवणाऱ्या पुणेकरांच्या घरांवर चोरटे डल्ला मारत ‘करोडपती’ होत आहेत. पुणेकर कंगाल होत असताना पुणे पोलिस मात्र, या चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षातील केवळ घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पाहिल्यानंतर हे वास्तव दिसत आहे. साडे तीन वर्षात पुण्यासारख्या शांत व सुरक्षित शहरातील २ हजार बंद घरे फोडत तब्बल ७३ कोटींचा ऐवजावर डल्ला मारला आहे. त्यातील केवळ १३ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज परत मिळविण्यात यश आलेले आहे. त्यातून घरफोड्यांमागील भयावह वास्तव दिसत आहे.
शांत शहरासोबतच सुरक्षित शहर म्हणून पुण्याची ओळख. पण, गेल्या काही वर्षात गुन्हेगारांनी गालबोट लावले आहे. वाहन चोरी, सोनसाखळी, लुटमार आणि घरफोडी अशा सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे सर्व सामान्य पुणेकर हैराण आहेत. काही वेळांसाठीही घर बंद केल्यानंतर कायम तुमच्यावरच नजर ठेवल्याप्रमाणे ते घर फोडले जात आहे. रात्री आणि दिवसा देखील घरफोडीच्या घटना घडत असल्याने पुणेकरांनी घराला कुलूप लावायचे की नाही, असा प्रश्न पडला आहे.
घर फोडणारे चोरटे पोलिसांपेक्षा वरचढ ठरत असल्याचे हे चित्र आणखीनच गडद होत आहे. कारण, पोलिसांकडील नोंदीनुसार २०२२ ते जून २०२५ या साडेतीन वर्षात २ हजार १९ पुणेकरांची घरे फोडून तब्बल ७३ कोटी ६० लाख ४७ हजार १८७ रुपयांचा ऐवज चोरी करून नेला आहे. यापैकी ८८६ बंद फ्लॅटमध्ये चोरी करणाऱ्यांना पकडत पोलिसांनी १३ कोटी ४१ लाख ६९ हजार २५१ रुपयांचाच ऐवज परत मिळविला आहे.
घरफोड्यांचे आकडे बोलके
वाढते नागरीकरण अन् दुर्लक्षही जबाबदार
मोठ्या शहरात घरफोड्या घटना सातत्याने घडने तसे साहजिक असे समजले जाते. कारण, लोकसंख्या, वाढलेला परिसर व पोलिसांचे मनुष्यबळ आणि नागरिकांची बेफिकीरी यामुळे काही जानकर अधिकारी असे सांगतात. परंतु, घरफोडीच्या घटना घडल्यानंतर त्या उघड येण्याची प्रमाणे देखील म्हणावे तसे नाही. पोलिसांची कामगिरी सुमाराच आहे. निम्याहून अधिकच गुन्हे उघड झाले आहेत. त्यातही पुर्ण ऐवज पोलिसांना हस्तगस्त करता आलेला नाही. शहराचा उपनगर म्हणून असणारा व वेगाने वाढणाऱ्या परिसर हा चोरट्यांचा हक्काचा भाग असल्याचे दिसत आहे.