
दौलताबाद येथे गुड इअर कंपनीच्या गोदामातून टायर चोरीचा पर्दाफाश (Photo Credit - AI)
चोरीचा घटनाक्रम
फिर्यादी धीरज सरेश अग्रवाल (वय ४४, रा. गारखेडा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सिंधी सिरसगाव परिसरातील गुड इअर कंपनीच्या गोदामाच्या मागील बाजूचे शटर उचकटून १ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२.०६ ते पहाटे ०६.३० या वेळेत अज्ञात चोरट्यांनी ₹२ लाख ३५ हजार ००४ किंमतीचे एकूण ४९ टायर चोरी केले होते.
गुन्हा दाखल
या प्रकरणी २८ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी पोउपनि वसंत शेळके यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास सुरू केला.
चोरट्यांची टोळी जेरबंद
६ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या माहितीवरून, पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून आरोपी अमोल रमेश देशमुख (वय २८, रा. बोकटे, जि. नाशिक) यास ताब्यात घेतले.
गुन्ह्याची कबुली
चौकशीदरम्यान, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी देशमुख याने गुन्ह्यात सहभाग कबूल केला आणि आपले साथीदार लियाकत नरशेख (वय २८, रा. सातारा, छ. संभाजीनगर) आणि योगेश प्रल्हाद भारती (वय ३०, रा. चंदनपूर, जि. बुलढाणा) यांची नावे सांगितली. त्यानुसार दोघांनाही अटक करण्यात आली.
माल जप्त
या टोळीकडून चोरीस गेलेल्या ४९ पैकी २५ टायर पोलिसांनी जप्त केले आहेत. ही टोळी यापूर्वी एमआरएफ कंपनीचे टायरही चोरी करत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. भगीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.