रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
सातारा : शेंद्रे तालुका सातारा येथील ॲल्युमिनियम फाउंड्री कंपनीमध्ये ॲल्युमिनियमच्या 69 विटा चोरून नेणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने गस्तीदरम्यान चौकशी करून ताब्यात घेतले. याप्रकरणी अन्य दोन संशयितांपैकी एकाला पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून एकूण गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व अल्युमिनियमच्या विटा असा १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विजय शंकर पवार (रा. रामाचा गोट, मंगळवार पेठ, सातारा), अशोक मोहन मोरे (रा. कोर्टी, तालुका कराड, जिल्हा सातारा), गणेश उर्फ गोट्या लहू बोंडे (मूळ रा. पाली, तालुका कराड, जिल्हा सातारा, सध्या रा. काशीळ) अशी संबंधित आरोपींची नावे आहेत. त्यापैकी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. शेंद्रे तालुका सातारा येथील फाउंड्री फॅक्टरीमधून काही ॲल्युमिनियमच्या विटा चोरीला गेल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये ९ ऑक्टोबर रोजी दाखल झाली होती.
हेदेखील वाचा : Pune Crime: चोरीसाठी आलेल्या तीन चोरांना नागरिकांकडून बेदम मारहाण; एकाचा मृत्यू; पुणे येथील घटना
या प्रकरणासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तपासासंदर्भात निर्देशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी यांच्यासह पथकाने सातारा तालुक्यामध्ये गुन्ह्याच्या संदर्भाने पेट्रोलिंग सुरू केले.
स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय पवार आणि त्यांच्या साथीदारांसमवेत विशिष्ट ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पवार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. तसेच त्याच्या माहितीवरून तपास पथकाने अन्य एक साथीदाराचा पत्ता मिळवत त्यालाही ताब्यात घेतले. घरफोडीमध्ये चोरीस गेलेल्या ॲल्युमिनियमच्या ६९ विटा आणि गुन्ह्यात वापरलेली मारुती 800 असा १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.