मुलाच्या हव्यासापोटी दोन महिन्यांच्या मुलीची हत्या; जन्मदात्या आईचे कृत्य
राजकोट : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच, आता राजकोटमध्ये धक्कादायक घटना घडली. मुलाच्या हव्यासापोटी दोन महिन्यांच्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील एका महिलेनेच असे कृत्य केल्याचा आरोप आहे.
महिलेचे नाव मुस्कान कयानी आणि तिच्या पतीचे नाव साजिद आहे. दोघांचेही लग्न 6 वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यांना 6 वर्षांची नूरिना व 2 महिन्यांची आयेशा या दोन मुली आहेत. घटनेच्या दिवशी साजिद सकाळी 8 वाजता कामावर गेला होता आणि संध्याकाळी मुस्कानने फोन करून सांगितले की, आयेशा झूल्यातून बेपत्ता आहे. साजिदने ताबडतोब त्याच्या पालकांना कळवले. घरी पोहोचल्यावर त्यांना स्वयंपाकघरातील पाण्याच्या टाकीत आयेशा आढळली. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेनंतर मुस्कान काही दिवस साजिदसोबत राहिली. परंतु, नंतर साजिदने तिला तिच्या माहेरी पाठवले. काही काळानंतर, मुस्कानचा भाऊ मोहसिनने साजिदला घडला प्रकार सांगितला. त्यात मुस्कानने स्वतः कबूल केले की तिने आयेशाला पाण्यात बुडवून मारले.
इन्स्टाग्रामवर दिली माहिती
मोहसिनची पत्नी शाइस्ता हिनेही इन्स्टाग्रामवर साजिदला मेसेज पाठवून हीच माहिती दिली. सुरुवातीला साजिद पोलिसांकडे गेला नाही आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली. परंतु, जेव्हा मुस्कानने स्वतः साजिदवर तिच्या मुलीच्या मृत्यूचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली, तेव्हा साजिदने संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितले. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले.
उत्तर प्रदेशातही धक्कादायक घटना
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये काही दिवसांपूर्वी पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. त्याआधी त्यांनी मुलाला विष दिले आणि त्याची हत्या केली. सावकारांच्या जाळ्यात अडकल्याने आणि कर्जाच्या ओझ्याखाली त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. हॅन्डलूम व्यापारी सचिन ग्रोव्हर (36) आणि त्याची पत्नी शिवांगी (34) आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा असे मृतकाचे नाव आहे. या दाम्पत्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशातील शहाजहांपूरमधील दुर्गा एन्क्लेव्ह कॉलनीत घडली. त्यानंतर आता गुजरातमधून धक्कादायक प्रकार समोर आला.