पिंपरी: भागीदारी मध्ये व्यवसाय करण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका व्यक्तीकडून ४८ लाख २१ हजार रुपये घेत फसवणूक केली. ही घटना १८ जानेवारी २०२१ ते १ एप्रिल २०२४ या कालावधीत मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली. ऋषिकेश शिवाजी हिवरकर (३१, वराळे, मावळ) यांनी याप्रकरणी २८ एप्रिल २०२५ रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वासुदेव उर्फ लक्ष्मण कल्याण पिसाळ, दैवशाला वासुदेव पिसाळ (दोघे रा. डुडुळगाव, हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून ऋषिकेश यांना भागीदारीत पाईन वूड खरेदी-विक्री व उत्पादन हा व्यवसाय करण्याचे आश्वासन दिले. ऋषिकेश यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी गोल्डन टिंबर्स या नावाने फर्म रजिस्टर केली. यामध्ये ऋषिकेश यांचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यानंतर फर्मचे बँक खाते सुरु केले. ऋषिकेश यांच्याकडून व्यवसायासाठी एकूण ४८ लाख २१ हजार ५०० रुपये घेत त्यांची फसवणूक केली.
आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने २८ लाखांची फसवणूक
क्विक एक्स इंटरप्रायजेस कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास १० टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून ४३ लाख रुपये घेतले. त्यानंतर व्यक्तीला परताव्याच्या नावाखाली १५ लाख रुपये दिले. त्यानंतर परतावा अथवा गुंतवलेली रक्कम न देता २८ लाखांची फसवणूक केली. ही घंटा जून २०२१ ते २ जून २०२२ या कालावधीत कासारवाडी येथे घडली.
याप्रकरणी पीडित व्यक्तीने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हितेंद्र विजय छेडा, विजय छेडा, अशपाक सत्तार शेख, समीर सत्तार शेख (सर्व रा. ठाणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना संपर्क करून त्यांना क्विक एक्स इंटरप्रायजेस या कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याला दहा टक्के परतावा मिळेल, असे अमिश दाखवले. आरोपींवर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी ४३ लाख रुपये गुंतवणूक केली. दरम्यान आरोपींनी काही महिने फिर्यादी यांना १५ लाख रुपये परतावा दिला. त्यानंतर रक्कम देणे बंद करून त्यांचे उर्वरित २८ लाख रुपये न देता त्यांची फसवणूक केली. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.