UPI fraud By showing fake screenshot in lonavala maval crime news
Crime News : वडगाव मावळ : चोरटे आणि दरोडेखोरांकडून दरवेळी फसवणुकीचे वेगवगेळे फंडे शोधून काढले जात आहेत. हातचलाखी करुन फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार बुधवारी (दि. २५ जून) दुपारी लोणावळ्यात उघडकीस आला.
कुमार चौकातील एका दुकानात गर्दीच्या वेळी साहित्य खरेदी केल्यानंतर फसवणुकीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. स्टुड पेटीएम नावाच्या एका ॲपमधून सदर भामट्याने दुकानदाराला पैसे पाठविले असल्याचे भासवले. याचा स्क्रीनशॉट देखील मोबाईलवर दाखविला. मात्र दुकानदाराकडे पैसे आले नव्हते तसेच स्क्रीन शॉटच्या वरती जी वेळ दाखविण्यात आली होती. त्यात तफावत असल्याने दुकानदाराला सदर व्यक्ती विषयी संशय आला. त्याने त्याला शेजारी असलेल्या कुमार पोलीस चौकी येथे आणले. मात्र त्यावेळी त्याने चुकीने असे झाले असल्याचे सांगत पुन्हा दुसऱ्या एका अकाउंट वरून थोडे पैसे पाठवत सदर प्रकरण हात चलाखीने बाहेरच्या बाहेर मिटविण्याचा प्रयत्न केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मात्र दुकानदार व स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलीस चौकीत आणले. तेथे पोलीस हवालदार अनिल शिंदे यांनी हे फेक स्क्रीन शॉट कसे तयार केले त्याचे प्रात्यक्षिक करून पाहिले व त्याला तरुणाला पकडून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी पाठविले आहे. सदर युवक हा मुंबई भागातील आहे. त्याने यापूर्वी कुठे असे प्रकार केले आहेत का, याची देखील पोलीस चौकशी करत आहेत. सदर युवकाने त्याच्या मोबाईलमध्ये एक फेक ॲप ठेवले आहे. त्यावरून तो पैसे पाठवतो. प्रत्यक्षात पैसे जात नाहीत फक्त ट्रांजेक्शन झालेले दिसते. अशा प्रकारे तो फसवणूक करत होता. नागरिकांनी आणि व्यवसायिकांनी अशा खोट्या सायबर गुन्ह्यापासून सावध राहण्याचे आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लोणावळा हे पर्यटन स्थळ आहे. तिथे दररोज हजारो पर्यटक येत असतात. या गर्दीचा फायदा घेत काही भामटे डिजिटल पेमेंटच्या निमित्ताने दुकानदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे या प्रकारातून समोर आले आहे. गर्दीच्या वेळेस अनेक वेळा डिजिटल पेमेंट केले असल्याचे पाहून दुकानदार दुर्लक्ष करतात त्यामुळे अशा भामट्यांचे फावत आहे. मागील वर्षी अशाच प्रकारे मुंबई भागातील एका कुमार हॉटेल समोरील लोणावळा नगर परिषदेच्या फ्री पार्किंगमध्ये वाहने पार्क करून त्यांच्याकडून पार्किंगचे पैसे गोळा करत असताना रंगेहात पकडला होता. पर्यटन स्थळांवर गर्दीचा फायदा घेत अशा प्रकारे नागरिकांना व पर्यटकांना गंडा घालणारे भामटे बाहेर गावावरून येत लोणावळा शहराचे नाव खराब करत आहे.