बीड : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 9 डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्याभरातून रोष व्यक्त करण्यात आला होता. आता या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. सीआयडी आणि एसआयटीने देखील या प्रकरणाचे दोषारोप पत्र दाखल केले आहे. याप्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी निर्दोष मुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज सादर केल्याची माहिती समोर आली आहे.
बीड जिल्हा न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीत दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. पहिल्यांदा वाल्मिक कराडच्या वकिलांनी निर्दोष मुक्तीसाठीचा अर्ज न्यायालयात सादर केला. याचा उज्ज्वल निकम यांनी विरोध केला. यावर 24 तारखेला सीआयडी आपलं म्हणणं मांडणार आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केले. सरकारी वकिलांनी सादर केलेला पेन ड्राइव्ह आम्हाला मिळावा अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. यावर आम्ही पुरावे लगेच देत आहोत असं उत्तर उज्ज्वल निकम यांनी दिलं. हे पेन ड्राइव्ह कुठल्याही परिस्थितीत बाहेर जात कामा नये, अशी विनंती निकम यांनी न्यायालयाला केली आहे.
वाल्मिक कराड फरार असतानाच्या काळात प्रॉपर्टी सील करण्यासंदर्भातला अर्ज आरोपीच्या वकिलांनी केला होता. त्या अर्जाची प्रत मिळावी, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. त्यानंतर वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी विष्णू चाटे सध्या लातूरच्या कारागृहात आहे. आपल्याला लातूरमधून बीडमध्ये हलवावे अशी विनंती विष्णू चाटेच्या वतीने करण्यात आली आहे.
धनंजय देशमुखांचे गंभीर आरोप
धनंजय देशमुख यांनी आपल्या जबाबामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड केल्या आहेत. ते म्हणाले आहेत की, बंधू संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांनी आरोपी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला अनेकदा विनंतीसाठी फोन केले होते. फोनवरून त्यांनी आपल्या भावाला सोडण्याची 20 हून अधिकवेळा विनंती केली होती. मात्र, विनवणी करूनही आरोपींनी ऐकले नाही, असे धनंजय देशमुख म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, “आरोपी विष्णू चाटे यांनी वारंवार सांगितले की, दहा मिनिटात सोडतो, वीस मिनिटात सोडतो.. अर्ध्या तासात सोडतो. पण त्यांनी संतोष देशमुख यांना सोडलं नाही. त्यांची क्रूर हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांना खंडणीच्या आड येऊ नकोस, नाहीतर जीवे मारू, अशी धमकी विष्णू चाटे याने याआधीच दिली होती. धनंजय यांनी सांगितले की, त्यांनी या धमकीनंतरही केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली होती. मात्र, त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडत गेली. शेवटी भावाची निघृण हत्या करण्यात आली,” असे धनंजय देशमुख हे आपल्या जबाबामध्ये म्हणाले आहेत.