कागदपत्रांवर अंगठे घेऊन रक्कम केली ट्रान्सफर
हिंगोली : वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन येथील एका महिलेची तब्बल 20 लाख 43 हजारांची फसणवूक करण्यात आली. पीडित महिला ही माजी सैनिकाची पत्नी आहे. शांताबाई कुटे असे या महिलेचे नाव आहे. या महिलेसोबत धक्कादायक घटना घडल्याचे आता उघडकीस आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील नीलेश गांगे (रा. मुकुंदवाडी) या युवकाविरोधात गुरुवारी उशिरा रात्री वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शांताबाई कुटे यांचे पती कुंडलिक कुटे सैन्यात सेवेत होते. निवृत्तीनंतर त्यांना पेन्शन व इतर लाभाची रक्कम मिळत होती. मात्र, 2018 मध्ये त्यांच्या निधनानंतर ही पेन्शन शांताबाई यांच्या नावावर वसमत येथील भारतीय स्टेट बँकेच्या खात्यात जमा होत होती.
हेदेखील वाचा : सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने रोखली बंदूक, पोलिसांकडून गोळीबार; नांदेड येथील प्रकार
पेन्शनची बकाया रक्कम मिळावी यासाठी शांताबाई प्रयत्नशील होत्या. यादरम्यान त्यांच्या नातेवाइकांमार्फत त्यांची ओळख नीलेश गांगे याच्याशी झाली. त्याने ‘तुमची सैनिक पेन्शन सुरु करून देतो’ असा विश्वास शांताबाईंना दिला. त्यानंतर विविध कागदपत्रांवर त्याने अंगठे घेऊन त्यांचे शोषण केले.
विश्वासाचा घेतला गैरफायदा
या विश्वासाचा गैरफायदा घेत निलेशने शांताबाई यांच्या भारतीय स्टेट बँक, वसमत शाखेतील खात्यातील थकीत पेन्शन व चालू पेन्शन मिळून तब्बल २० लाख ४३ हजार रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले. काही दिवसांनी शांताबाईंना संशय आल्याने त्यांनी बँकेत चौकशी केली. चौकशीत नीलेश गांगेनेच संपूर्ण रक्कम आपल्या खात्यात वळवून घेतल्याचे समोर आले.
माहिती मिळताच पोलिसांत धाव
घटनेचा उलगडा होताच शांताबाईंनी वसमत पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले व जमादार शेख समी तपास करीत आहेत. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त केले असून पुढील तपास सुरू आहे.