
crime (फोटो सौजन्य: social media)
संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला
९ डिसेंबर २०२४ ला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आल. अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. एवढेच नाही तर हत्येदरम्यान त्यांच्या तोंडावर लघुशंका पण करण्यात आली. हत्या करतानाचे व्हिडीओ बनवण्यात आले. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.
या हत्येप्रकरणी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप असून त्यांना अटक करण्यात आली. तर याच प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडून सुरू असून मुख्य आरोपी कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे. सुमारे १४०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असून दोषनिश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. ही घटना २०२४ मध्ये घडली असली, तरी २०२५ मध्ये या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे निघाले. आजही देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
हुंड्यासाठी अमानुष छळ
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात घडलेल्या हुंडाबळीच्या घटना ऐकून अजूनही अंगावर शहारे येतात. वैष्णवी हगवणे हिचा सासरच्यांकडून हुंड्यासाठी अमानुष छळ करण्यात आला. पीडितेच्या माहेरकडून पैसे तसेच फॉर्च्युनर गाडी देऊनही सासरच्यांची मागणी थांबली नाही. पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे आणि इतर नातेवाईकांकडून वैष्णवीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचे समोर आले. अखेर या छळाला कंटाळून तिने १६ मे रोजी आत्महत्या केली. या प्रकरणात ११ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर “मुलीचे लग्न करताना संपत्तीपेक्षा माणसं पाहा” असे वैष्णवीच्या वडिलांचे भावनिक वक्तव्य राज्यभर गाजले. महाराष्ट्रातून या घटनेनंतर अनेक हुंडाबळीच्या घटना समोर येत आहे.
स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार
पुण्यातील स्वारगेट बस स्थानक जे राज्यातील सर्वात वर्दळीचे बस स्थानक मानले जाते. या बसस्थानकात फेब्रुवारी २०२५ मध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले. पहाटेच्या सुमारास बसची वाट पाहणाऱ्या एका तरुणीला “मी बसचा कंडक्टर आहे” असे सांगून आरोपीने शिवशाही बसमध्ये नेले. त्यानंतर बसचे दरवाजे बंद करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव असून, घटनेनंतर तो शेतात लपून बसला होता. पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घालून त्याला अटक केली. या प्रकरणात आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून २५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. स्वारगेटसारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
२०२५ हे वर्ष महाराष्ट्रासाठी विकास, प्रगती आणि संधींचं वर्ष असायला हवं होतं. मात्र काही अमानुष, क्रूर आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांनी या प्रगत राज्याला अंतर्मुख होण्यास भाग पाडलं. राजकारण, कुटुंबव्यवस्था, सार्वजनिक सुरक्षितता आणि महिलांच्या संरक्षणाबाबत अनेक गंभीर प्रश्न या घटनांनी उपस्थित केले. न्याय व्यवस्थेवरचा विश्वास टिकवण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा होणे अत्यावश्यक आहे. नवीन वर्षात अशा घटना इतिहासजमा व्हाव्यात आणि माणुसकी, सुरक्षितता व न्याय या मूल्यांवर उभा राहणारा महाराष्ट्र घडावा, हीच अपेक्षा असणार आहे.
Ans: संतोष देशमुख हत्या, पुण्यातील हुंडाबळी प्रकरण आणि स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार.
Ans: कायदा-सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, कौटुंबिक हिंसाचार आणि न्यायप्रक्रियेतील विलंब.
Ans: दोषींना कठोर शिक्षा, महिलांचे संरक्षण आणि सामाजिक संवेदनशीलता वाढवण्याची गरज अधोरेखित झाली.