
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा स्वतः एक उत्कृष्ठ असा गोलंदाज आहे. सध्या तो २०२६ च्या आयपीएल (IPL) हंगामात ‘लखनौ सुपर जायंट्स’ (LSG) संघाकडून खेळताना दिसणार आहे. आगामी हंगामात अर्जुनला ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये स्थान मिळेल की नाही, हा सध्या एक मोठा प्रश्न उपस्थित होता. याच पार्श्वभूमीवर, भारताचे माजी क्रिकेटपटू यांनी एक मोठा दावा केला आहे. केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत ते अर्जुनला जगातील सर्वोत्तम फलंदाजात बनवणार असल्याचं विधान त्यांनी केलंय.
एका माध्यामाशी बोलताना युवराज सिंग यांचे वडील, योगराज सिंग यांनी हा धाडसी दावा केला आहे. “मी संपूर्ण जगाला आव्हान देतो: जर अर्जुन तेंडुलकरने माझ्यासोबत प्रॅक्टिसमध्ये सहा महिने घालवले, तर तो जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला मागे टाकेल. काही लोक आपल्या टीव्हीसमोर बसून चर्चा करत असतात की, ‘तो हे करू शकत नाही’ किंवा ‘ते करू शकत नाही.’ यावर मी त्यांना उलट प्रश्न करतो ‘तुम्ही स्वतः कोण आहात?’ आणि जेव्हा स्वतः क्रिकेटपटूच अशा प्रकारे बोलतात, तेव्हा ते खरोखरच धक्कादायक वाटतं.”
योगराज सिंग यांनी पुढे ठामपणे सांगितले, “अर्जुन तेंडुलकरमध्ये जगातील सर्वात धोकादायक फलंदाज बनण्याची क्षमता आहे. जर कोणाला याबद्दल शंका असेल, तर त्याला माझ्याकडे पाठवा. जर मी हे साध्य करण्यात अपयशी ठरलो, तर मी माझी दाढी काढून टाकेन.” असा दावा त्यांनी केला आहे.
अर्जुनला एक महान खेळाडू म्हणून घडवण्याच्या आपल्या योजनेबद्दल बोलताना योगराज सिंग म्हणाले, “त्याला दररोज १५,००० चेंडूंचा सामना करण्याचा सराव करावा लागेल. सर गारफिल्ड सोबर्स यांच्या पंक्तीत बसणारा खेळाडू म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. आपल्या पहिल्याच रणजी करंडक सामन्यात, सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने शतक ठोकले होते. त्याने आपल्या प्रशिक्षकाकडे अशी विनंती केली होती की, त्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती द्यावी आणि ‘लिस्ट ए’ आणि टी-२० सामन्यांमध्ये ओपनिंग करण्याची संधी द्यावी; परंतु त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मला अर्जुन तेंडुलकर हवा आहे; मी त्याच्यात बदल घडवून सर्वकाळातील महान खेळाडूत बनवेन.”
अर्जुन तेंडुलकरच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकीर्दीचा विचार करता, त्याने एकूण केवळ पाच सामने खेळले आहेत. आणि हे सर्वच्या सर्व सामने त्याने ‘मुंबई इंडियन्स’ संघाकडून खेळले आहेत. या सामन्यांदरम्यान ज्या पाच डावांमध्ये अर्जुनने गोलंदाजी केली, त्यामध्ये त्याने तीन बळी मिळवले आहेत. याव्यतिरिक्त, एका डावात फलंदाजी करताना त्याने १३ धावा केल्या.