अत्याचाराला विरोध केल्याने नराधम संतप्त; डोक्यात वरवंटा घालून मुलीची केली हत्या
सातारा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच अत्याचाराला विरोध केल्याने एका नराधामाने 13 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर सासपडे (ता.सातारा) येथील चिडलेल्या ग्रामस्थांनी शनिवारी (दि.११) आरोपीच्या घरावर दगडफेक करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दित्यानंतर गावात शांतता निर्माण झाली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी परीक्षा झाल्यानंतर संबंधित मुलगी वडिलांकडून चावी घेऊन घरी गेली. घरी गेल्यानंतर ती आतल्या खोलीत कपडे काढत होती. त्यावेळी तिच्या घरात व आजुबाजूला कोणी नसल्याचे पाहून राहुल घरात गेला. त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने त्याला जोरदार प्रतिकार केला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिला फरशीवर आपटले व तिला बाथरुमच्या दिशेने ओढत नेले तिथलाच वरवंटा तिच्या डोक्यात घातला. त्यात मुलगी रक्तबंबाळ झाल्याने आरोपीने तेथून पळ काढला.
हेदेखील वाचा : वडील आणि भावाची केली हत्या, नंतर आईचा र्धवट जळालेला मृतदेह सापडला, अल्पवयीन मुलीला तीन वर्ष कैद आणि सामूहिक…
दरम्यान, थोड्यावेळाने तिचा लहान भाऊ सार्थक हा शाळेतून घरी आला. त्यावेळी त्याला संबंधित मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. घाबरलेल्या सार्थकने जाऊन वडिलांना ही बाब सांगितली. ग्रामस्थांनी तातडीने तिला सातारा येथे जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मुलीचा खून कोणी केला? मुलीला नेमके कोणी मारते? यावरुन सासपडे गावात शुक्रवारी तणाव निर्माण झाल्याने, तातडीने गावात दाखल झालेल्या बोरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगाने तपास करत राहुल यादव याला ताब्यात घेतले.
ग्रामस्थांमध्ये तणावाचे वातावरण
अवघ्या 13 वर्षांच्या मुलीचा निष्पाप खून झाल्याची घटना जिल्हाभर पसरल्यानंतर ग्रामस्थांमध्येही संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या विनंतीनंतर शनिवारी सकाळी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सासपडे येथे आणण्यात आला. यावेळी जोपर्यंत खूनी पोलिस ताब्यात घेत नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.