पालकांनी मोबाईल घेऊन न दिल्याने तरुण नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन
जळगाव : तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली. एका 23 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. त्याने एका क्षुल्लक कारणावरून हे टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आले. ममुराबाद गावात शुक्रवारी (दि.२२) पोळ्याच्या दिवशी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास गच्चीवर जाऊन गळफास घेतल्याचा प्रकार घडला.
पालकांनी मोबाईल घेऊन दिला नाही या कारणाने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ऋषीकेश विजय न्हावी (वय २३, रा. ममुराबाद, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. ऋषिकेशचे वडील विजय हे शेतीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना ऋषिकेश हा मिळेल ते मोलमजुरीचे काम करून मदत करत होता.
दरम्यान, नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून त्याने पालकांकडे नवीन मोबाईल घेऊन द्या म्हणून हट्ट धरला होता. परंतु, आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने पालकांनी समजूत काढून त्याला नकार दिला होता. शुक्रवारीदेखील त्याने संध्याकाळी घरी आल्यावर पालकांकडे हट्ट धरला. काही वेळाने रागाच्या भरात तो गच्चीवर गेला व झोक्याच्या बंगळीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ऋषिकेशच्या आईने गच्चीवर येऊन पाहताच बसला धक्का
काही वेळाने ऋषिकेशची आई गच्चीवर पाहण्यास गेली असता मुलाने गळफास घेतल्याचे दिसल्याने त्यांनी एकच हंबरडा फोडला. आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या मदतीने ऋषिकेशला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे.
गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होतीये वाढ
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच सोलापूरमध्ये एकाच स्कार्फचा वापर करून तरुण-तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. दरम्यान, अनेकवेळा अशा प्रकरणांमध्ये आत्महत्या करणारे प्रेमीयुगुल असतात. मात्र, या प्रकरणात हे दोघे मानलेले ‘भाऊ-बहीण’ असल्याचे समोर आले आहे.