
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन बेतले जीवावर; आर्थिक अडचण आल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
चंद्रपूर : सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाच प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने पुन्हा एकदा हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खंडाळा येथील एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
रोहित हरडे (वय २५) या तरुणाने ऑनलाईन गेमिंगमध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे व वाढत्या कर्जाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. २४) उघडकीस आली. रोहित हा ब्रह्मपुरी येथील एका राईस मिलमध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याला ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले होते. या खेळात त्याने मोठ्या प्रमाणात पैसे गमावले होते. परिणामी, त्याच्यावर कर्जाचा मोठा बोजा पडला होता. या आर्थिक विवंचनेतूनच त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे आई-वडिलांनी रोहितला उठवण्यासाठी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय बळावला.
दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ
एका होतकरू तरुणाने अशाप्रकारे आपले जीवन संपवल्याने खंडाळा गावात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ऑनलाईन गेमिंग हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते गंभीर व्यसन ठरू शकते. त्यामुळे तरुणांनी अशा खेळांच्या आहारी जाऊ नये, तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांच्या मोबाइल वापरावर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गर्भवती महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे पतीसह राहणाऱ्या २७ वर्षीय गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१३) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त करत फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.