पूर्ववैमनस्यातून तरूणाची हत्या (संग्रहित फोटो)
नागपूर : ‘अरे धावा… माझ्या लेकराला वाचवा…’ मुलावर धारदार शस्त्राने सपासप वार होत असताना आई जीवाच्या आकांताने मदतीसाठी धावपळ करत होती. मात्र, काही क्षणातच डोळ्यांसमोर तिच्या काळजाचा तुकडा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मध्यरात्री जरिपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुशीनगर परिसरात घडलेल्या घटनेने परिसर हादरला आहे. शर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जुन्या वैमनस्यातून राजवीर शर्मा (वय १८, रा. कुशीनगर) याची निर्घृण हत्या केली तर मध्यस्थीसाठी धावलेला मित्र नयन सोनबरसे याच्यावरही वार केले. नयनवर उपचार सुरू आहे. याप्रकरणी जरिपटका पोलिसांनी राज इलमकर (वय २२), रोहित इलमकर (वय २०) आणि हनी डोंगरे (वय २५, तिघेही रा. कुशीनगर) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना केली आहेत.
घरातील भांडण विकोपाला ! चपात्या बनवण्याच्या तव्याने पतीवर केले सपासप वार, जमिनीवर तडफडत पतीचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजवीर बहिणीच्या घरून घरी परतत असताना आरोपींनी रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर गालावर झापडही मारली. त्यानंतर राजवीर घरी परतला. तो रागात असल्याचे पाहून आईने विचारपूस केली. राजवीरने घरातून दांडा घेतला. त्याचा राग पाहून आईने घराबाहेर जाऊ नये म्हणून दार बंद केले. मात्र, काही वेळाने राजवीर कसातरी घराबाहेर पडला. राजवीर दिसताच आरोपींनी पुन्हा वाद घातला. आरोपींनी धारदार शस्त्र काढून राजवीरवर जीवघेणे वार करण्यास सुरुवात केली.
आईलाही ठार मारण्याची धमकी
राजवीरला रक्तबंबाळ केल्यानंतरही त्यांनी हल्ला थांबवला नाही. आई आरडाओरड करत असल्याचे लक्षात आल्यानंतर इलमकर बंधूंनी ‘ही राजवीरची आई आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर तिचाही खून करू’ अशी धमकी दिल्याचे समोर आले आहे. राजवीरचा मित्र नयन सोनबरसे मध्यस्थी करण्यासाठी आला असता आरोपींनी त्याच्यावरही वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी राजवीरला मृत घोषित केले. नयनवर उपचार सुरू आहे.
जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

