संग्रहित फोटो
पुणे : घरात कोणीही आमदार नसताना देखील एका कारवर फॅन्सी नंबरप्लेट लावून त्यावर ‘विधानसभा सदस्य, आमदार’ असा लोगो चिकटवून फिरणाऱ्या गाडी मालकाचा प्रताप पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. वारजे माळवाडी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार समोर आणला आहे. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दिग्वीजय दिपक मोरे (वय ३३, रा. नऱ्हे) असे गुन्हा नोंद झालेल्या गाडी मालकाचे नाव आहे. ही कारवाई २१ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे.
वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रविण जाधव व त्यांचे पथक कर्वे ब्रिज परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एका शोरूमसमोर काळ्या रंगाची कार वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने उभी असल्याचे आढळले. वाहनावर ‘एमएच.१२.एस.एफ.१२’ असा फॅन्सी नंबर होता. तसेच पुढील काचेच्या डाव्या बाजूला ‘विधानसभा सदस्य, आमदार’ असा लोगो देखील होता. पोलिसांनी ई-चालान मशीनच्या माध्यमातून वाहनमालकाचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, संबंधित व्यक्तीने वाहन आपले नसल्याचे सांगितल्याने पोलिसांनी काही वेळ प्रतीक्षा केली. नंतर वाहन क्रेनच्या सहाय्याने वारजे वाहतूक विभागात आणून जमा करण्यात आले.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी वाहनमालकाकडे अधिक चौकशी केली असता तो स्वतः किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही आमदार नसल्याचे निष्पन्न झाले. आमदार असल्याचा आभास निर्माण करून दिशाभूल करण्याच्या उद्देशाने लोगो वापरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार सरकारतर्फे तक्रार देऊन बीएनएस कलम २०५ तसेच मोटार वाहन कायदा कलम १७७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस असल्याची बतावणीने गंडा, आरोपीला बेड्या
पोलिस असल्याची बतावणी करीत नागरिकांकडून पैसे घेणार्या तोतयाला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २३ सप्टेंबरला सकाळी अकराच्या सुमारास बालेवाडीतील लक्ष्मीनगरात उघडकीस आली. वैभव संतोष भोंग (वय २५ रा. पिसेवाडी, माळशिरस, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अमलदार मनोज देशमुख यांनी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.






