सोलापूर जिल्ह्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं मोठं विधान
पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या परिवर्तनाची जिथून सुरुवात झाली, त्या तुंगत गावामध्ये विधानसभेची देखील मुहूर्तमेढ रोवण्यात आली. माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांची पहिली सभा तुंगत येथे संपन्न झाली. यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. अभिजीत पाटलांसारखा वाघ त्यांना टक्कर देण्यासाठी तयार असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त विधानावर अजित पवार संतापले; म्हणाले,विनाशकाले विपरित बुद्धी
यंदा आपल्याला परिवर्तन करायचे आहे. आपल्या तालुक्याचा आवाज विधानसभेत घुमवायचा आहे. आपलं मत हे अभिजीत पाटील यांना नसून तालुक्याच्या विकासाला आहे. जसं की विठ्ठलच्या निवडणुकीत मतदानरुपी आशीर्वाद दिला तो सार्थ ठरवून दाखवला. तसेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण अभिजीत पाटील यांच्या पाठीशी राहून आशीर्वाद देऊ. नक्कीच ते आपले प्रश्न विधानसभेमध्ये मांडतील, असा विश्वासही व्यक्त केला.
लोकसभेच्या निवडणुकीत करकंब येथील सभेतील जयंत पाटील यांनी अभिजीत पाटील म्हणजे नेताजी पालकर आहे, अशी उपमा त्यांनी बोलताना व्यक्त करून दाखवली होती. याला उजाळा दिला. यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, ‘निवडणूक ही कारखान्याची नसून विधानसभेची आहे. तालुक्यामध्ये प्रश्न बरेच आहेत. त्या प्रश्नावर आपण बोलू. ऊस आणि कारखाना हा विधानसभेतील प्रश्न नाही. मी जो काही शब्द देतो तो मी पूर्णच करतो’.
मला राजकारण करायचं नाही
तसेच मला राजकारण करायचं नाही, समाजाची सेवा करायची आहे. वंचित शोषित यांना न्याय देण्याचे काम करायचे आहे. या भागाचा विकास करण्यासाठी मतदानरुपी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी द्यावी, अशी भावनिक साद श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी उपस्थित नागरिकांना घातली.
अभिजीत पाटलांसारखा वाघ टक्कर देण्यासाठी तयार
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बोलताना सांगितले की, शंकरराव मोहिते-पाटील, स्वर्गीय औदुंबरअण्णा यांनी सहकार हे स्वतःच्या कुटुंबासारखे जपले आणि चालवले काही राजकीय लोकांनी सहकार मोडून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, अभिजीत पाटलांसारखा वाघ त्यांना टक्कर देण्यासाठी तयार झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातील पोरगा यांना वरचढ चालायला लागले आहे. हे विरोधक म्हणतायेत आम्ही स्वतःच्या जीवावर मोठे झालोय. आम्हाला कोणी सहकार्य केलं नाही तर उमेदवारीसाठी उंबरे का झिजवले लागले, असा सवालही त्यांनी केला.
तुमची एवढी ताकद होती तर…
तुमची एवढी ताकद होती तर आत्तापर्यंत स्वतःच्या हिंमतीवर का आमदार झाले नाहीत? आमच्याकडील 14 गावातून मोठे मताधिक्य मिळेल. मला इथल्या जनतेकडून सुद्धा तसाच शब्द पाहिजे. इकडचा भाग वनवे झाला पाहिजे अशा पद्धतीचे अशी अपेक्षा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुंगत येथील सभेमध्ये व्यक्त केली.