
मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष भाजप, शिवसेना (शिंदे गट) चे अनेक उमेदवार मतदानापूर्वीच बिनविरोध झाल्याने यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. आता हाच पॅटर्न जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसून येत आहे. मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचा गुलाल उधळला आहे. महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध झाले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा मंगळवार शेवटचा दिवस होता. त्यामुळे १५ जिल्हा परिषद आणि समितीच्या पंचायत १२५ निवडणुकांमधील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, तत्पूर्वीच काहींनी विजयाचा गुलाल उधळला. यात कोकण अग्रेसर असून, कोकणात महायुतीने विजयी खाते उघडले आहे. तळकोकणात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच महायुतीचे तब्बल २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात रायगड जिल्ह्याच्या महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे गणातून उभे असलेले अनिल जाधव बिनविरोध आल्याने महायुतीचे २२ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्येही महायुतीने विजयाचा आनंद साजरा केला.
हेदेखील वाचा : Dharashiv News: तेर गटात अपक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम; भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणुकीत रंगत
दरम्यान, पंचायत समितीमध्ये बिडवाडी पंचायत समिती संजना राणे, वरवडे पंचायत समिती सोनू सावंत, कोकीसरे पंचायत समिती साधना नकाशे, पडेल पंचायत समिती अंकुश ठुकरूल, नाडण पंचायत समिती गणेश राणे, बापर्डे पंचायत समिती संजना लाड, नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ, नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके, शिरगाव पंचायत समिती शीतल तावडे, फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण, जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण, आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर, आसोली पंचायत समिती संकेत धुरी हे भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
तर कोळझर पंचायत समितीमध्ये शिंदेसेनेचे गणेशप्रसाद गवस उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात उबाठा सेनेच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील कोलझर पंचायत समिती महायुतीचे उमेदवार गणेशप्रसाद गवस बिनविरोध, ठाकरे शिवसेनेचे प्रवीण परब यांनी माघार घेतल्याने गणेशप्रसाद गवस निवडून आले. गवस हे शिंदेंच्या शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख म्हणून काम पाहत असून कोलझर पंचायत समितीमधून ते बिनविरोध निवडून आले आहेत.
रायगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाडमधून शिंदे शिवसेनेला शुभसंकेत मिळाला आहे. महाड पंचायत समिती निवडणुकीत सवाने धामणे पंचायत समिती गणातून उभे असलेले अनिल जाधव यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघारी घेतल्याने अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदे शिवसेनेने आपला पहिला बिनविरोध विजय मिळवत रायगडमध्ये जल्लोष केला.
भाजपचे सर्वाधिक 19 उमेदवार
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपचे १९ तर शिंदेसेनेचे २ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा परिषद मध्ये खारेपाटण जिल्हा परिषद उमेदवार प्राची इस्वालकर, बांदा जिल्हा परिषद उमेदवार प्रमोद कामत, पडेल जिल्हा परिषद उमेदवार सुयोगी घाडी, बापर्डे जिल्हा परिषद उमेदवार अवनी तेली, कोळपे जिल्हा परिषद उमेदवार प्रमोद रावराणे, किंजवडे जिल्हा परिषद उमेदवार सावी लोके या भाजपकडून बिनविरोध झाल्या आहेत. तर, जाणवली जिल्हा परिषद उमेदवार रुहिता तांबे या शिंदेसेनेचे उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहे.