
तेर गटात अपक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम
घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत भाजपाने अर्चना पाटील यांना पक्षाचा एबी फॉर्म नाकारला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने अर्चना पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने होत होती. अखेर अपक्ष म्हणून त्यांची उमेदवारी कायम राहिल्याने तेर गटातील निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे.
दरम्यान, अर्चना पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनीही समाजमाध्यमांवरून “लागा तयारीला” असा संदेश देत कार्यकर्त्यांना थेट प्रचारात उतरण्याचे आवाहन केले आहे. पक्षाची अधिकृत उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या भाजपाच्या समर्थक कार्यकर्त्यांना त्यांनी तेर गटातून अर्चना पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या जया नवनाथ नाईकवाडी यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्चना पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या सक्षणा सलगर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या किर्तीमाला महादेव खटावकर, राष्ट्रीय समाज पक्षाच्या सुप्रिया सचिन देवकते तसेच आम आदमी पक्षाच्या रत्नमाला तानाजी पिंपळे या उमेदवार मैदानात आहेत.
अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम राहिल्यानंतर त्यांचे पती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे समर्थक कार्यकर्तेही सक्रियपणे त्यांच्या प्रचारात उतरल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपाच्या अधिकृत उमेदवार नाईकवाडी यांची राजकीय अडचण वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या अर्चना पाटील यांच्या विजयासाठी काम करत असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे तेर गटातील निवडणूक केवळ पक्षीय न राहता अंतर्गत राजकारणाची लढाई बनली असून, यावर विरोधी पक्ष कोणती रणनिती आखतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कर्जत-खालापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापले! आमदार महेंद्र थोरवे यांच्यासमोर आव्हान उभे