ajit pawar gives A strong candidate against jitendra awhad
कळवा : विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. निवडणूक जाहीर केल्यामुळे राजकीय खलबत वाढली आहेत. जागावाटपावरुन अद्याप बोलणी सुरु असून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. महायुतीच्या पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अद्याप यादी जाहीर केलेली नाही. मात्र शरद पवार गटाच्या विरोधात अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केला आहे.
अजित पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 38 उमेदवारांची यादी जाहीर करत अजित पवार यांनी अनेक नेत्यांना हिरवा कंदील दिला आहे. तसेच बारामतीमधून अजित पवार यांनीच उमेदवारी घेतली आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध अजित पवारांनी उमेदवार जाहीर केला आहे. अजित पवार गटाकडून कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राजकीय खेळी खेळण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी सहकारी असलेले नेते आता एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत.
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची शिदोरी जोपासून आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे पाऊल टाकत आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. मी सर्व उमेदवारांना त्यांच्या यशस्वी… pic.twitter.com/T6MOZPf5gs
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 23, 2024
अजित पवार यांची उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांच्या विश्वासातील नेते आणि सहकारी म्हणून ओळखले जात होते. आता मात्रा कळवा विधानसभेमध्ये ते जितेंद्र आव्हाड यांना कडवे आव्हान देणार आहेत. नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. पण राष्ट्रवादीमध्ये बंडाचे राजकारण झाल्यानंतर नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
हे देखील वाचा : अखेर ठरलं! बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार देणार लढत
मुंब्रा-कळवा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला अशी लढत होणार आहे. अजित पवार यांनी स्वतः एबी फॉर्मचे वाटप केले होते. यात नजीब मुल्ला यांचा समावेश होता. तेव्हापासून कळवा मतदारसंघाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. येत्या 28 ऑक्टोबरला नजीब मुल्ला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याच दिवशी जितेंद्र आव्हाड सुद्धा आपला अर्ज दाखल करणार आहे. कळव्यामध्ये निवडणुकीमध्ये नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांच्या थेट सामना होणार आहे.