bjp first and ajit pawar ncp is on second number in mahayuti said by chhagan bhujbal
नाशिक : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण सुरु आहे. निकालामध्ये महायुतीला बहुमतापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले आहे. मात्र निकाल लागून 10 दिवस झाले तरी देखील सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. महायुतीमध्ये खातेवाटपवरुन नाराजीनाट्य सुरु आहे. तर येत्या 5 डिसेंबर रोजी शपथविधी होणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. आधीच तारीख जाहीर करत भाजपने एकप्रकारे शिंदे गटाला इशारा दिला आहे. यामध्ये आता अजित पवार गटाच्या नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष असल्याचे विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट झाले आहे. तर त्यानंतर शिंदे गट आणि त्यानंतर अजित पवार गट अशी रचना महायुतीमध्ये होती. मात्र आता महायुतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे वक्तव्य अजित पवार गटाचे बडे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्रिपद व खातेवाटपावरुन महायुतीचे सरकार स्थापनचे घोंगडे भिजत राहिले आहे. यावर प्रक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले की, शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अजित पवार गटाचा स्ट्राईक रेट जास्त आहे. स्ट्राईक रेटनुसार पाहिले तर आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे महायुतीमध्ये भाजप एक नंबरवर तर आम्ही दुसऱ्या क्रमाकांवर आहोत, असे वक्तव्य अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.
पुढे छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवारांसोबत आमची जेव्हा बैठक झाली तेव्हा मी त्यांच्यासोबत स्ट्राईक रेटबाबत बोललो आहे. राज्यात भाजप एक नंबर तर आम्ही दोन नंबर आहे, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर महायुतीमध्ये मंत्रिमंडळामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावर देखील भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यावर उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, मंत्रिमंडळ तयार करताना अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येती. मात्र यावेळी जरा जास्तच अडचण होणार आहे. कारण दरवेळी 160 आमदार असतात. मात्र यावेळी आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पक्षातील जुन्याच नेत्यांना पुन्हा एकदा संधी दिली गेली असल्याचे दिसून येणार आहे.
भाजपचा एकप्रकारे शिंदे गटाला इशारा
काळजीवाहू एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी मागील दोन ते तीन दिवसांपासून सर्व बैठका रद्द केल्या आहेत. त्यामुळे सरकार स्थापनेला विलंब होत आहे. असे असताना एकनाथ शिंदे हे काही खात्यांवर दावा करत आहेत मात्र भाजपला ते मान्य नाही. मुख्यमंत्रिपदावरचा एकनाथ शिंदेंनी दावा सोडल्यामुळे त्यांनी गृहखाते व नगर विकास खात्यांची मागणी केली आहे. मात्र भाजपला ती मान्य नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे व भाजपमध्ये अद्यापही वाटप झालेले नाही. असे असताना देखील शपथविधीची तारीख भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. अशा प्रकारे भाजपने शिंदे गटाला एकप्रकारे इशारा दिला आहे. यामध्ये अजित पवार व अमित शाह यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.