BJP leader Rajesh Pandey's appeal to vote for Sunil Shelke, Vadgaon Maval
वडगाव मावळ : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असून धुराळा उडाला आहे. मतदारांपर्यंत पोहचण्याचे आणि मतदानाचे आवाहन केले जात आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. वडगाव मावळमध्ये देखील राजकारण रंगले आहे. आमदार सुनील शेळके यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी त्यांना मतदान करण्याचे आवाहन भाजप पक्षश्रेष्ठींकडून केले जात आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी मावळातील मतदारांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार येण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे मावळातील भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विजयासाठी समर्पित भावनेने काम करावे, अशा स्पष्ट सूचना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मावळातील भाजपचे काही नेते पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची दिशाभूल करत महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचा जाहीर प्रचार करीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रदेश कार्यालयाने एका पत्राद्वारे पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे तालुक्यातील भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला असून सर्वजण पूर्ण ताकतीनिशी महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विजयासाठी रिंगणात उतरले आहेत. “केवळ भाजप उमेदवारच नव्हे तर युतीतील मित्रपक्षाचे उमेदवार लढत असलेल्या मतदारसंघातही भाजप कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी समर्पित भावनेने काम करावे. आपल्या सर्वांच्या कठोर परिश्रमामुळे राज्यात महायुती निश्चितपणे विजयी होईल,” असे पांडे यांनी पत्रात म्हटले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी आमदार सुनील शेळके यांच्याशी संपर्क साधला. मावळातील भाजप कार्यकर्ते हे पक्षनिष्ठ असून ते पक्षाच्या आदेशाचे पालन करतात. त्यामुळे या निवडणुकीतही ते महायुती धर्माचे पालन करतील, अशी ग्वाही त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वतीने दिली.