Devendra Fadnavis and Nitin Gadkari Checking of bags
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नेत्यांमध्ये राजकारण रंगले असून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. प्रचारसभांमधून महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांमध्ये वाद विवाद सुरु आहेत. सध्या राज्यामध्ये राजकारण्यांच्या बॅग चेकिंगवरुन रान उठलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या बॅग चेक केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. निवडणूक आयोग फक्त विरोधी नेत्यांची तपासणी करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला. त्यानंतर आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या देखील बॅगाची तपासणी करण्यात आली आहे. याचे व्हिडिओ शेअर करुन त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघा एक महिना बाकी राहिला आहे. निवडणूक प्रचारातील गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगाकडून जागोजागी चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. तसेच नेत्यांच्या बॅगची व गाड्यांची तपासणी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या बॅगची दोन वेळा तपासणी करण्यात आली. वणी येथे बॅग तपासणी केल्यामुळे उद्धव ठाकरे संतापले होते. त्यानंतर पुन्हा एकदा बॅग तपासणी केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची उलट तपासणी घेतली. तसेच स्वतः व्हिडिओ काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला देखील लगावला होता. त्याचबरोबर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या देखील बॅगाची तपासणी करण्यात आली. यानंतर आता सत्ताधारी भाजप नेत्यांची देखील तपासणी घेतल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.
हे देखील वाचा : नितीन गडकरींवर निवडणूक आयोगाची कारवाई, लातूरमध्ये केली हेलिकॉप्टरची चौकशी
भाजपने आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुन लिहिले आहे की, “कोल्हापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्या बॅंगाची यापूर्वीच तपासणी झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते! हा व्हीडिओ पहा, 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी झाली. (हा तो 5 नोव्हेंबरचा व्हिडिओ) दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. संविधानाचे भान प्रत्येकाला असलेच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे,” असा घणाघात भाजपकडून करण्यात आलेला आहे.
जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!
हा व्हीडिओ पहा, 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा मा.… pic.twitter.com/ebkuigJE2E— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 13, 2024
त्याचरोबर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ठेवलेल्या बॅगांची लातूरमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. नितीन गडकरी लातूरहून निघाले होते, त्याआधी निवडणूक आयोगाचे अधिकारी पोहोचले आणि त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ठेवलेले सामान तपासले. पण, या शोधमोहिमेत त्यांना काहीही मिळाले नाही. त्यानंतर नितीन गडकरी आपल्या इच्छित स्थळी रवाना झाले. त्यामुळे सत्ताधारी भाजप नेत्यांच्या बॅगाची तपासणी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सत्ताधारी नेत्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे.