अजित पवार राजभवन येथे दाखल
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट)-शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट)-शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. असे असताना आता राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होताना दिसत आहे. त्यानुसार, अजित पवार हे राजभवन येथे दाखल झाले आहेत.
हेदेखील वाचा : मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंना आज द्यावा लागणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा? कारणही आलं समोर…
विधानसभा निवडणुकीनंतर आता नवीन सरकारच्या शपथविधीची उत्सुकता आहे. तत्पूर्वी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मावळत्या विधानसभेची मुदत आज (दि.26) अखेरीपर्यंत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला व मंत्रिमंडळाचा राजीनामा देणार आहेत. त्यानुसारच, आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले आहेत.
दरम्यान, आता मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे. असे असताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी राहावे; शिंदे गटाची मागणी
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदे गटाने इच्छा व्यक्त केली आहे. भाजपने ‘बिहार पॅटर्न’ महाराष्ट्रात राबवावा, असे खासदार नरेश म्हस्के यांनी मत व्यक्त केले आहे. तर मराठा आरक्षणाचा प्रश्न एकनाथ शिंदेच सोडवू शकतात, त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी केली आहे.