PM Narendra modi pune live sabha 2024
अक्षय फाटक : पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यामध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पाकिस्तान व कॉंग्रेस यांची काश्मीरबाबत एकच मागणी असल्याचा घणाघात देखील पंतप्रधान मोदी यांनी केला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये हे औरंगजेबाचे कौतुक करतात, असा घणाघात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील भाषणामध्ये केला. त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये पार पडलेल्या या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील विकासकामांबद्दल महत्त्वाची भूमिका मांडली. पुण्याला “कनेक्टीव्हिटी” शहर बनवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आयटी हब अन् शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्याला येत्या काळात देशातील पहिले “कनेक्टीव्हीटी” शहर बनवणार असल्याचे सांगत त्यांनी पुण्याच्या जनतेचे आभार देखील मानले. पुणे व भाजपचे नाते वेगळे आहे. पुण्याने नेहमी भाजप विचारांचे समर्थन केलेले आहे,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
येणारी पाच वर्ष हे विकासाच्या दृष्टीने उड्डाण घेणारी
विधानसभा निवडणूकीच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुण्यात आले होते. त्यांनी पुण्याच्या स. प महाविद्यालयाच्या मैदानातून पुणेकरांशी सवांध साधला. यावेळी महायुतीचे प्रमुख नेते, उमेदवार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, पुणे आणि भाजप यांच्यातील नाते नेहमी भाजपच्या विचारांचे समर्थन करणारे राहिले आहे. “पुण्यातील जनतेचे मी आभार मानतो. महायुतीचे सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणखी जोरात काम करणार आहे. येणारे पाच वर्ष हे विकासाच्या दृष्टीने उड्डाण घेणारे असेल.
पुण्यातील नागरिकांना सशक्त करण्यासाठी शहरात गुंतवणुकीसोबतच त्यांना पायाभुत सुविधा, औद्योगिकरण केले जाईल. त्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीवर काम केले आहे. महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीत विक्रमी वाढ झाली असून, त्यात पुण्यात मोठी गुंतवणुक होत आहे,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
पुण्यासाठी महायुती सरकारने केली विकासकामं
पुढे ते म्हणाले की, “इलेक्ट्रॉनिक व आयटी क्षेत्रात ही गुंतवणूक झाली आहे. कंपन्यांची संख्या वाढली आहे. या ‘स्टार्ट अप’चा युवकांना फायदा झाला असून, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. वाहन उद्योग हा नेहमी अग्रेसर राहिला आहे. येथील गुंतवणुकीमुळे नवीन संधीची दारे उघडली आहेत. शहराला याद्वारे सर्व सुविधा, उद्योग, साधने देऊन कनेक्टीव्हीटी करीता महायुती काम करत आहे.
तुमच्या आकांक्षा मला आदेश देतात. तुमचे स्वप्न हे दिवस-रात्र काम करण्यासाठी माझ्यासाठी प्रेरणा आहे. तुमचे जीवन सुकर असावे ही प्राथमिकता आहे, त्यासाठी पुण्यात मेट्रोचा विस्तार केला जात आहे. त्यासोबतच पुण्याच्या रिंगरोडसाठी ४० हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत, खोपोली खंडाळा मिसींग लिंकसाठी साडे सहा हजार तर बाह्य वर्तुळाकार रस्त्यांसाठी साडे दहा हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. आज एकादशी आहे. एकादशी म्हंटल्यानंतर पालखी सोहळा आठवतो, त्यासाठी या पालखी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. वारकऱ्यांसाठी हा मार्ग पालखी मार्गाचे म्हणजे, ही समर्पित सेवा आहे” असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील भाषणामध्ये व्यक्त केले.