भर प्रचारसभेत मिथुन चक्रवर्तींचं पाकिट मारलं; भाजपच्या उमदेवाराने मंचावरूनच चोरांना केली ही विनंती
महाराष्ट्रप्रमाणे झारखंडमध्येही प्रचार जोमात सुरू आहे. उद्या झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान धनबाद जिल्ह्यातील निरसा विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार अपर्णा सेन गुप्ता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आज बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची निरसा मतदारसंघात प्रचारसभा पार पडली. मात्र प्रचारासाठी आलेल्या मिथून चक्रवर्तींना वेगळाच अनुभव आला. कोणीतरी त्यांच पाकीट मारलं होतं.
प्रचार सभेला मिथुन चक्रवर्तींच्या उपस्थितीमुळे हजारोंची गर्दी जमली होती. या गर्दीचं व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्थाही योग्य पद्धतीने लावण्यात आली नव्हती. त्यामुळे गर्दीत धक्का-बुक्की सुरू झाली आणि त्यात काही चोरांनी मिथुन चक्रवर्तींचे पाकिट मारलं. मिथुन चक्रवर्तींना हे लक्षात आलं त्यांनी त्वरित भाजप नेत्यांना याची माहिती दिली. भाजपाच्या नेत्यांनी मंचावरून चोरांना मिथुन चक्रवर्तींचे पाकिट परत करण्याची विनंती केली. मात्र मिथुन चक्रवर्तींचं पाकिट परत मिळालं नाही. त्यामुळे मिथुन चक्रवर्ती सभा लवकर आटोपून निघून गेले.
सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेनंतर मिथुन चक्रवर्तींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या सीआयएसएफ (CISF) चे जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. विशेषत: सोशल मड्यावर त्यांना धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे सीआयएसएफने मिथुन चक्रवर्तींची सुरक्षा Y प्लस श्रेणीच्या सुरक्षा देण्यात आली आहे. यावेळी, मुंबई पोलिसांद्वारे अभिनेता सलमान खानलाही Y प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
हेही वाचा–Rahul Gandhi : ‘PM मोदींनी राज्यघटना वाचली असती तर…’; राहुल गांधीचा गोंदियाच्या सभेतून हल्लाबोल
ऑक्टोबर 2024 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांना दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेल्या योगदानासाठी लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना ते भावुक झाले होते. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करत ते म्हणाले होते की, सावळ्या रंगाची व्यक्ती अभिनेता होऊ शकत नाही, असं त्यांना सांगितलं होतं. त्यावेळच्या संघर्ष सांगताना मिथुन चक्रवर्तींना अश्रू अनावर झाले होते.