Sanjay Raut accuses former Chief Justice D. Y. Chandrachud of rigging Maharashtra election results
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. प्रतिष्ठेची लढाई म्हणून ओळखली जात असलेली यंदाची निवडणूक महायुतीने एका बाजूने जिंकली आहे. महायुतीने महाविकास आघाडीला अक्षरशः धुळ चारत घवघवीत यश मिळवले. महायुतीच्या या विजयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही झालं त्याला सर्वस्वी धनंजय चंद्रचूड जबाबदार असल्याची टीका केली आहे.
महाराष्ट्रतील 288 जागांपैकी 234 जागा मिळवून महायुतीने नवा विक्रम रचला आहे. यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. जोरदार प्रचारानंतर देखील महाविकास आघाडीला यश आले नाही. याबाबत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना जोरदार टीका केली. खासदार संजय राऊत म्हणाले, निकाल आधीच ठरला होता फक्त मतदान करुन घेतलं, मतदान होऊ दिलं. तसंच जे काही घडलं त्याला देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार आहेत. त्यांनी सरन्यायाधीश असताना जर वेळेवर आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला असता तर या गोष्टी घडल्याच नसत्या. तुम्ही निकाल देणार नसाल तर मग त्या खुर्च्यांवर का बसला होता? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
संजय राऊत यांनी देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यावर गंभीर शब्दांत टीका केली. राऊत म्हणाले की, धनंजय चंद्रचूड हे उत्तम प्रोफेसर किंवा बाहेर भाषणं द्यायला चांगले आहेत. मात्र सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय दिला नाही. यासाठी इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर चंद्रचूड यांनी योग्य निकाल दिला असता तर महाराष्ट्रातलं चित्र बदललं असतं. चंद्रचूड यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराच्या खिडक्या ते उघड्या ठेवून गेले आहेत. आत्ताही कुणीही कुठेही कशाही उड्या मारु शकेल, आमदार विकत घेऊ शकेल. कारण दहाव्या सूचीची भीतीच राहिली नाही. न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली. जी काही दुर्घटना महाराष्ट्रात झाली त्याला जस्टिस चंद्रचूड जबाबदार आहेत. इतिहासात त्यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल, अशी गंभीर टीका संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महायुतीचा उद्या(दि.25) शपथविधी सोहळा होणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री कोण होणार ते गुजरात लॉबी ठरवेल. महाराष्ट्राऐवजी गुजरातला शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल. शिवतीर्थावर शपथविधी सोहळा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल. तसंच वानखेडे स्टेडियमवर शपथविधी झाला तर तो महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान होईल. हे सरकार गुजरात लॉबीला हवं होतं, त्यामुळे आणण्यात आलं आहे आणि लादण्यात आलं आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला.