भाजपच्या विजयात संघाचा मोठा वाटा (फोटो- ट्विटर)
Rashtriy Swyamsevak Sangh: काल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील जनतेला महायुतीला जनादेश दिला आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे विरोधी पक्ष नेमण्यासाठी लागते तितकेही बहुमत नसल्याचे समोर आले आहे. महायुतीने महाविकास आघाडीला 50 वरच रोखले आहे. दरम्यान , आता महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधी 25 तारखेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मात्र भाजपने 133 जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या एवढ्या मोठ्या विजयामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा हात असल्याचे म्हटले जात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आखलेल्या नियोजनबद्ध आखणीमुळे भाजपला महाराष्ट्रात मोठे यश मिळवता आले असे म्हटले जात आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 133 जागा भाजपने जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला क्लीन स्वीप दिल्याने अनेकांनी पराभवाचे विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. तर काही जण ईव्हीएम मशीनवर टीका करताना दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपने संघाची मदत नको असल्याचा किंवा आता भाजप एवढा मोठा पक्ष झाला आहे की संघाची गरज नाही अशा प्रकारची विधाने केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदणात उतरला नसल्याचे म्हटले जाते. मात्र त्यानंतर विधानसभेसाठी भाजपने सावध पवित्रा घेत संघाकडे मदत मागितली आणि आज भाजपला राज्यात मोठे यश मिळाले असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभेला भाजपच्या विजयासाठी संघ नेतृत्वाने कमान हाती घेतल्याचे म्हटले जात आहे. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात होते असे बोलले जात होते. विधानसभेत भाजपला यश मिळवून देण्यासाठी संघाने सूत्र हाती घेतली आणि आपल्या संघटन कौशल्याचा वापर केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यातील अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने लहान-मोठ्या बैठका घेतल्या. त्या भागतील सामाजिक, राजकीय परिस्थिती जाणून घेतली. जास्तीत जास्त कुटुंबाशी संपर्क साधला. राष्ट्रहित, हिंदुत्व, सुशासन याबाबत नागरिकांना आश्वस्त करण्यात संघाला यश आले. लोकांमध्ये संघाबद्दल असलेला विश्वासाचा फायदा झाल्याचे दिसून आले. ठेत भाजपला मतदान करावे अशा प्रकारे प्रचार न करता राष्ट्रहित जपणाऱ्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून विश्वासहर्ता निर्माण करण्याचा प्रयत्न संघाने केला. संघाच्या या सूक्ष्म प्लॅनिंगमुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठा विजय मिळवता आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. संघ कधीही राजकारणात उतरला नसला तरी त्यांची विचारधारा जपणाऱ्या भाजपच्या मदतीला संघ कायमच धावून आला आहे. मतदान पूर्ण होताच देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची देखील भेट घेतली होती. तसेच मतदान होण्याआधी व निवडणूक जाहीर होण्याआधी देखील भाजप सातत्याने संघाच्या संपर्कात असल्याचे पहायाला मिळाले होते. संघाने आपल्या अनेक कोपरा बैठका घेत 60 ते 70 मित्र संघटनांची मोट बांधण्याचे काम केले आणि त्यामुळेच भाजपचा मोठा विजय या राज्यात झाल्याचे पाहायला मिळाले.
संघाचा फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा?
महायुतीच्या नवीन सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटल्याची चर्चा सुरू आहे. भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे म्हटल्याचे सांगितले जात आहे. संघ परिवार देखील फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे.