yashomati Thakur angry on Bjp Vasantrao deshmukh controversial statement
संगमनेर : कॉंग्रेस नेत्या आणि बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे वादग्रस्त विधान करण्यात आले. यामुळे संगमनेरचे वातावरण तापले आहे. भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. कॉंग्रेसकडून याचा तीव्र विरोध करण्यात येत असून गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. महिला नेत्यांवर खालच्या पातळीवर केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहे. आता कॉंग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी भाजपला इशारा दिला आहे.
जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेमुळे संगमनेरचे राजकारण तापले आहे. या प्रकरणावर यशोमती ठाकूर यांनी रोष व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “कालच्या वक्तव्यामध्ये अतिशय नीच प्रवृत्ती भाजपच्या नेत्याची व कार्यकर्त्याची दिसत आहे. त्या व्यासपीठावर सुजय विखेंसारखा तरुण नेता होता असे कसे सहन करु शकतो? महिलांना प्रोटेक्शन करून आमदारकी घेतली आहे ते आता झोपले आहेत का? यामधून महिलांप्रती आरएसएस आणि भाजपची काय मानसिकता आहे हे दिसून येत आहे. ज्यांनी ज्यांनी हे वक्तव्य केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. असे वक्तव्य जर भाजपच्या नेत्यांना आवडत असेल तर त्यांचा निषेध आहे,” अशा कडक शब्दांत यशोमती ठाकूर यांनी इशारा दिला आहे.
हे देखील वाचा : सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे दिलीप मानेंची सिंहगर्जना; महाविकास आघाडीत पेच निर्माण
गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यशोमती ठाकूर यांनी सवाल उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस यांना हे पटते आहे का? देवेंद्र फडणवीस तुमच्या राज्यात काय चालले आहे ? याला आपण रामराज्य म्हणायचं का ? तुमचे असली रंग समोर येत असून आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पाहिलात तर खबरदार याद राखा,” असा इशारा कॉंग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.
वसंतराव देशमुख यांनी हे वादग्रस्त विधान केल्यानंतर जयश्री थोरात यांनी देखील नाराजी व्यक्त केली. त्यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. रात्री दहा वाजेपासून सुरू असलेलं ठिय्या आंदोलन अद्यापही सुरूच आहे. जयश्री थोरात, बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे आणि त्यांचे पती डॉ. सुधीर तांबे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते संगमनेर तालुका पोलीस ठाण्या समोरच बसून आहेत. बाळासाहेब थोरात यांची कन्या आणि बहिणीने पूर्ण रात्र काढली पोलीस ठाण्यासमोर बसून काढली आहे. पोलिसांनी गुन्हा दखल करण्यास विलंब केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.