
Aarti Solanki On Balancing Devi: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
गणेशोत्सव नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. यंदा बाप्पाचे कोणते रूप पाहायला मिळणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण गेल्या दोन वर्षांपासून बॅलेंसिंग गणपती बाप्पाचा एक नवा ट्रेंड आला आहे.
गेल्यावर्षीपासून हे बॅलेंसिंग गणपती यायला लागले. मूर्ती एका पायावर तिरपी उभी, हवेत तरंगतेय असं वाटतं. बघायला भारी वाटतं पण अनेक जुन्या लोकांना आणि भाविकांना ते आवडलेलं नाही. पूर्वी बाप्पा सिंहासनावर किंवा चौरंगावर बसलेला असायचा, त्यात एक रुबाब असायचा. आता एका पायावर उभा असलेला बाप्पा पाहून अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. Aarti Solanki On Balancing Devi:
सोशल मीडियावर यावरून खूप ट्रोलिंग पण झालं. सणाची व्याख्या कुठेतरी बदलतेय असं अनेकजण म्हणाले.आता गणपती गेले आणि नवरात्र आली. देवीच्या आगमनाची धामधूम सुरु झाली आहे. सगळीकडे मंडळं देवीला घेऊन जाताना दिसत आहेत. गरबा, दांडिया, नऊ दिवस नऊ रंग याची तयारी सुरु झाली आहे. पण इथे पण तोच प्रकार सुरु झाला आहे.
गणपती पाठोपाठ आता देवीच्या पण बॅलेंसिंग मूर्ती बाजारात आल्या आहेत. देवी पण हवेत लटकतेय, एका हातावर तिचा तोल सावरलाय असं दाखवलं जातंय. हे पाहून अनेकांना राग आला आहे.
या सगळ्या प्रकारावर मराठी अभिनेत्री आरती सोळंकी हिने थेट संताप व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून आपला राग व्यक्त केला आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “हिंदू म्हणून तीव्र निषेध, बॅलेंसिंगच्या नावाखाली गणपती बाप्पांना लटकवलं आता देवींना लटकवू नका.
एवढीच कला दाखवायची असेल तर त्याच अँगल वर स्वतःच्या घरातल्यांना लटकवा आम्ही येऊ तुमचं कौतुक करायला नक्की…. आपल्या हिंदू सणांची परंपरा, मर्यादा, शिस्त, लाज या गोष्टी जपा त्याचं हसं होऊ देऊ नका.” तिच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. अनेक भाविक म्हणत आहेत की आरतीने जे म्हटलंय ते एकदम बरोबर आहे. देवांच्या मूर्ती म्हणजे खेळ नाही. त्यात एक पावित्र्य असतं.
खरं तर मूर्तिकार आपली कला दाखवण्यासाठी असे प्रयोग करतात. त्यांना वाटतं लोकांना नवीन काहीतरी दाखवावं. पण कला दाखवण्याच्या नादात आपण परंपरेला विसरतोय का? हा मोठा प्रश्न आहे. गणपती बाप्पा असो किंवा देवी, त्यांच्या मूर्तीमध्ये एक सात्विकता असते. ती मूर्ती पाहिली की हात आपोआप जोडले जातात. पण जेव्हा मूर्ती एका पायावर तिरकी लटकते तेव्हा ते जरा विचित्रच वाटतं.
लहान मुलांना ते गंमत वाटेल पण मोठ्या माणसांना ते पटत नाही. नवरात्रीचे नऊ दिवस खूप पवित्र असतात. देवीची पूजा मनोभावे केली जाते. अशावेळी देवीची अशी लटकती मूर्ती आणून तिचा मान राखला जातो का? असा सवाल आरती सोळंकीने उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावरपण दोन गट पडले आहेत. काहीजण म्हणतात की हा बदल स्वीकारायला हवा, यात वाईट काय आहे? पण जास्तीत जास्त लोक म्हणत आहेत की सणांचे पावित्र्य जपलं पाहिजे. उगाच नवीन ट्रेंड म्हणून देवांना लटकवू नका.आरती सोळंकीच्या या रोखठोक भूमिकेमुळे आता हा वाद आणखीनच पेटला आहे. यंदाच्या नवरात्रीत किती मंडळं अशा बॅलेंसिंग देवी बसवतात आणि लोक त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.