
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Aishwarya Rai Birthday: बॉलिवूडची सौंदर्यवती आणि लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज ५३ वा वाढदिवस आहे. आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेने तिने मनोरंजनविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकून ऐश्वर्याने जगभरात भारताचा नावलौकिक वाढवला. मात्र, फार कमी लोकांना माहीत आहे की, मिस वर्ल्ड होण्यापूर्वीच तिला चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे, तिने त्यावेळी तब्बल चार चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या होत्या. यामध्ये आमिर खानच्या ‘राजा हिंदुस्तानी’चाही समावेश होता. शिक्षण आणि स्वतःच्या करिअरला प्राधान्य देत तिने हा निर्णय घेतला होता.
ऐश्वर्या रायच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर झाली असली, तरी मनोरंजनविश्वाशी तिचा संबंध त्याआधीच आला होता. १९९१ मध्ये तिने फोर्ड सुपरमॉडेल स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती आणि फॅशन मासिकांमधून ती लोकप्रिय झाली.
२०१२ मध्ये ‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने खुलासा केला होता की, मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वीच तिला किमान चार चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. मात्र, त्यावेळी तिने अभिनयाऐवजी शिक्षण आणि मिस इंडिया स्पर्धेला प्राधान्य दिले.
आमिर खानसोबत झाला असता पहिला चित्रपट!
ऐश्वर्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर तिने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला नसता, तर आमिर खानसोबतचा ‘राजा हिंदुस्तानी’ हा तिचा पहिला चित्रपट ठरला असता. मात्र, तिने ही संधी स्वीकारली नाही. पुढे १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात करिश्मा कपूर झळकली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.
ऐश्वर्याला त्यावेळी आपले शिक्षण अर्धवट सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश करायचा नव्हता. तिच्या मते, तिच्याकडे पाहून तरुणांनी शिक्षण सोडून ग्लॅमरच्या दुनियेत येण्याचा निर्णय घेऊ नये. त्यामुळे तिने आधी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याला महत्त्व दिले.
सुष्मिता सेननंतर दुसऱ्या क्रमांकावर, पण मिस वर्ल्डचा मुकुट ऐश्वर्याच्या शिरपेचात!
जानेवारी १९९४ मध्ये ऐश्वर्याने मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सुष्मिता सेनने विजेतेपद पटकावले, तर ऐश्वर्या दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यानंतर नोव्हेंबर १९९४ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले.
या स्पर्धेत ८६ देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम फेरीत विचारलेल्या प्रश्नाला ऐश्वर्याने अतिशय सुंदर उत्तर दिले. तिच्या मते, मिस वर्ल्डमध्ये करुणा, गरजूंबद्दल संवेदनशीलता आणि जात, धर्म, वर्ण किंवा सामाजिक दर्जाच्या पलीकडे जाऊन माणसाकडे पाहण्याची वृत्ती असायला हवी. तिच्या या उत्तराने परीक्षकांची मने जिंकली आणि तिने १९९४ चा मिस वर्ल्ड किताब पटकावला. रीटा फारियानंतर हा किताब जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली.
तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण
मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याने लगेच बॉलिवूडमध्ये प्रवेश केला नाही. १९९७ मध्ये मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ या तमिळ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याच वर्षी तिचा पहिला हिंदी चित्रपट ‘और प्यार हो गया’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती बॉबी देओलसोबत दिसली होती.
१९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जीन्स’ या तमिळ चित्रपटामुळे तिला दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही चांगली ओळख मिळाली. त्यानंतर अक्षय खन्नासोबत ‘आ अब लौट चलें’ या चित्रपटात ती झळकली. मात्र, १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ने तिच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी दिली. याच वर्षी सुभाष घई यांच्या ‘ताल’ चित्रपटातूनही तिने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘हम दिल दे चुके सनम’साठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
२००० मध्ये ऐश्वर्या ‘मोहब्बतें’, ‘जोश’ आणि ‘हमारे दिल आपके पास है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. त्यानंतर ‘देवदास’, ‘धूम २’, ‘जोधा अकबर’ आणि ‘गुरू’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली.
केवळ बॉलिवूडपुरते मर्यादित न राहता ऐश्वर्याने आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतही आपले स्थान निर्माण केले. ‘ब्राइड अँड प्रेज्युडिस’, ‘द मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेस’, ‘प्रोव्होक्ड’, ‘द लास्ट लिजन’ आणि ‘द पिंक पँथर २’ यांसारख्या इंग्रजी चित्रपटांमधून ती आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर आली. तिला ‘ट्रॉय’, ‘रश अवर’ आणि विल स्मिथच्या काही चित्रपटांसाठीही ऑफर्स मिळाल्या होत्या. मात्र, व्यस्त वेळापत्रकामुळे तिला या संधी स्वीकारता आल्या नाहीत.
एकेकाळी कान्स फिल्म फेस्टिव्हलपासून हॉलिवूडपर्यंत चर्चेत असलेली ऐश्वर्या सध्या चित्रपटांमध्ये तुलनेने कमी दिसते. मात्र, तिची लोकप्रियता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख आजही कायम आहे. मिस वर्ल्डचा मुकुट, बॉलिवूडमधील यश आणि जागतिक स्तरावरील प्रसिद्धी असा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.