
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Allu Arjun Fans: अल्लू अर्जुन हा केवळ बॉक्स ऑफिसवर यश मिळवणारा अभिनेता नाही, तर त्याची देशभरात मोठी चाहतावर्गही आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेत अल्लू अर्जुन फॅन असोसिएशन (AAFA)च्या चाहत्यांनी HPV लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रासह देशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तब्बल ८२० जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून ३ लाखांहून अधिक मुलींपर्यंत हा संदेश पोहोचवण्यात आला आहे.
AAFAच्या माध्यमातून HPV लसीकरण जनजागृतीचे उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचवले जात आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, ओडिशा आणि अंदमान-निकोबार बेटे या आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुमारे ८२० कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या उपक्रमातून ३ लाखांहून अधिक मुलींना HPV लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. HPV लसीकरणाबाबत योग्य माहिती पोहोचवणे आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
AAFAने यापूर्वी HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रमाची घोषणा केली होती. आता या मोहिमेला आणखी व्यापक स्वरूप मिळत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून सोलापूर टीमने सोलापूर जिल्ह्यातील निळकंठेश्वर हायस्कूलमध्ये HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रम सुरू केला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना HPV लसीकरणाचे महत्त्व, त्याचे प्रतिबंधात्मक फायदे आणि HPV-संबंधित आजारांपासून भविष्यातील पिढीचे संरक्षण करण्यासाठी लसीकरणाची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली.
या मोहिमेच्या माध्यमातून HPV लसीकरणाबाबत समाजात योग्य चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर सर्व्हायकल कॅन्सरपासून बचाव आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक उपायांबाबत अधिकाधिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा AAFAचा प्रयत्न आहे.
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी आपल्या सामूहिक पोहोच आणि प्रभावाचा उपयोग सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयासाठी केल्याने हा उपक्रम चर्चेत आला आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची चाहत्यांची ही भावना या मोहिमेतून दिसून येत आहे.