
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मुंबईत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी ऑटो-रिक्षा चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या उपक्रमातून त्यांनी महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. कार्यक्रमात त्यांनी ‘हरित वाहतूक’ आणि शाश्वत जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.या कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी ई-रिक्षा चालवली, तर त्यांच्या मागे रिक्षात बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर बसली होती.
त्यांचा ऑटो-रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या अनोख्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
मुंबईत भामला फाउंडेशन आणि गोदरेज यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ‘पिंक ई-रिक्षा’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस, अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि नुपूर सॅनॉन यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमांतर्गत सुमारे १००० महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक ई-रिक्षांचे वितरण करण्यात येणार आहे.महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी आणि चालक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अमृता फडणवीस यांनी स्वतः ई-रिक्षा चालवून सर्वांचे लक्ष वेधले.हा उपक्रम मुंबईत चर्चेचा विषय ठरत असून, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
माध्यमांशी बोलताना भूमीने या कार्यक्रमाबद्दल सांगितले की, हा केवळ एक पर्यावरणीय उपक्रम नाही, तर महिलांची सुरक्षा, सक्षमीकरण आणि आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणारा उपक्रम देखील आहे.अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा भामला फाऊंडेशनने तिला या उपक्रमाबद्दल माहिती दिली, तेव्हा तिने लगेचच त्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. तिने सांगितले की, महिला चालकांना ई-रिक्षा पुरवल्या जातील, ज्यामुळे त्यांना रोजगार आणि आर्थिक बळ मिळेल.
#WATCH | Mumbai: Amruta Fadnavis, wife of Maharashtra CM Devendra Fadnavis, drives an autorickshaw as she attends the launch of Pink E-Rickshaw support initiative on World Environment Day under Bhamla Foundation’s Women-Led Green Mobility Program. pic.twitter.com/FOOKreLMAM — ANI (@ANI) June 1, 2026
भूमी म्हणाली की, जर देशातील महिला सक्षम झाल्या, तर देश आणखी वेगाने प्रगती करेल. ती म्हणाली की, महिला सक्षमीकरणाबद्दल नेहमीच बोलले जाते, परंतु भामला फाऊंडेशनने त्याची व्यावहारिक अंमलबजावणी करून दाखवली आहे.
अमृता फडणवीस यांनी रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या उपक्रमातील त्यांचे दृश्य सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.काही दिवसांपूर्वीच त्यांनी केंद्र सरकारच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कारऐवजी सायकलचा वापर करून पर्यावरणपूरक संदेश दिला होता.