
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Antara Banerjee: टीव्ही, चित्रपट आणि ओटीटी क्षेत्रात काम करणारी अभिनेत्री अंतरा बॅनर्जी सध्या एका वादामुळे चर्चेत आली आहे. बढो बहू’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘दिव्य दृष्टि’, ‘लाल इश्क’, ‘गुमराह’ आणि ‘सावधान इंडिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री अंतरा बॅनर्जी यांनी चुकीच्या ओळखीबाबत माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका FIR संदर्भातील वृत्तांमध्ये त्यांचा फोटो आणि ओळख चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले.
हा वाद तेव्हा निर्माण झाला, जेव्हा काही न्यूज पोर्टल्स, वेबसाइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर संबंधित FIR संदर्भातील बातम्यांमध्ये अंतरा बॅनर्जीचा फोटो प्रकाशित करण्यात आला. मात्र, या प्रकरणाशी अभिनेत्रीचा कोणताही संबंध नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
FIR ची पडताळणी केल्यानंतर तक्रारीत नमूद केलेली व्यक्ती ठाण्यातील मॉडेल अंतरा सोहम बॅनर्जी असल्याचे समोर आले. अभिनेत्री अंतरा बॅनर्जी आणि FIR मध्ये नमूद केलेली व्यक्ती या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. तरीही अभिनेत्रीचा फोटो अनेक प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि व्यावसायिक सहकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
माध्यमांशी संवाद साधताना अंतरा बॅनर्जी यांनी कोणतीही योग्य पडताळणी न करता तिचा फोटो कायदेशीर प्रकरणाशी जोडण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
“FIR ची साधी पडताळणी केली असती तरी माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही हे स्पष्ट झाले असते. तरीही माझा फोटो वापरून तो अनेक प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित करण्यात आला, ज्यामुळे अनावश्यक गैरसमज निर्माण झाले आणि माझ्या प्रतिमेला धक्का बसला,” असे त्या म्हणाल्या.
अंतरा ने सांगितले की, बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत तिला 900 हून अधिक फोन कॉल्स, व्हॉट्सअॅप संदेश आणि सोशल मीडिया मेसेज मिळाले. नातेवाईक, मनोरंजन क्षेत्रातील सहकारी, मीडिया प्रतिनिधी आणि शुभेच्छुक त्यांच्याकडून या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण मागत होते.
या संपूर्ण प्रकारामुळे स्वतःला आणि कुटुंबीयांना मोठ्या मानसिक ताणाचा सामना करावा लागल्याचेही तिने सांगितले.
“मनोरंजन क्षेत्रात मी वर्षानुवर्षांच्या मेहनतीने माझी ओळख आणि प्रतिष्ठा निर्माण केली आहे. ज्या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, त्याच्याशी माझे नाव जोडले जाणे अत्यंत वेदनादायक आहे,” असे अंतराने म्हटले.
पत्रकार परिषदेदरम्यान अंतरा ने ज्या मीडिया संस्था, वेबसाइट्स, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडिया पेजेसनी तिचा फोटो प्रकाशित केला आहे, त्यांनी तो तातडीने हटवावा आणि योग्य माहिती देऊन बातम्या अपडेट कराव्यात, अशी विनंती केली.
“ज्या-ज्या ठिकाणी माझा फोटो किंवा ओळख चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आली आहे, तेथे तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. जबाबदार पत्रकारितेची सुरुवात पडताळणीपासून होते,” असे त्यांनी नमूद केले.
Adinath Kothare: ‘रामायण’नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग-बजेट सिनेमात वर्णी; साकारणार खास भूमिका
अंतरा ने स्पष्ट केले की, तिचा उद्देश माध्यमांवर टीका करणे नसून तथ्य पडताळणी आणि जबाबदार पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे.
“हा विषय फक्त माझ्यापुरता मर्यादित नाही. आज अंतरा बॅनर्जी आहे, उद्या कोणीतरी दुसरे असू शकते. प्रतिष्ठा निर्माण करायला वर्षे लागतात, पण ती खराब व्हायला काही मिनिटे पुरेशी असतात. एका दिवसापेक्षा कमी वेळात आलेले 900 हून अधिक कॉल्स आणि संदेश चुकीची माहिती किती वेगाने पसरते हे दर्शवतात,” असे त्यांनी सांगितले.
भविष्यात कोणत्याही व्यक्तीची ओळख कायदेशीर प्रकरणाशी जोडण्यापूर्वी योग्य पडताळणी करूनच बातमी प्रसिद्ध केली जावी, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.
‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, अंतरा बॅनर्जी एका शूटिंगसाठी सुरतला जात होती. तिच्याकडे स्लीपर क्लासचं तिकीट होतं, मात्र ती आरक्षित एसी डब्यातून प्रवास करत असल्याचा आरोप आहे. एका प्रवाशाने याबाबत तक्रार केल्यानंतर वादाला सुरुवात झाली.वाद सुरू असताना अंतरा बॅनर्जीने पोलिसांशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. परिस्थिती चिघळल्यानंतर ती हिंसक झाली आणि तिने आपले कपडे काढल्याचं वृत्त आहे.याचदरम्यान तिने रेझर ब्लेड दाखवून आरपीएफ अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या झटापटीत अभिनेत्रीही जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.