(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Anupam Kher: नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात जटायूची भूमिका प्रत्यक्ष दिसत नसली तरी त्याच्या आवाजातून हे पात्र जिवंत करण्याचे काम अभिनेते अनुपम खेर यांनी केले आहे. आता अनुपम खेर यांनी जटायूच्या आवाजासाठी घेतलेल्या मेहनतीचा एक खास किस्सा सांगितला आहे. जटायूचा शेवटचा संवाद असलेली ‘हे राम’ ही ओळ अचूकपणे म्हणण्यासाठी त्यांनी तब्बल २०० वेळा सराव केला होता.
ज्यांनी ‘रामायण’ चित्रपट पाहिला आहे, त्यांना त्यातील सर्वात भावनिक दृश्यांपैकी एक असलेला जटायू आणि रावण यांच्यातील संघर्ष नक्कीच आठवत असेल. माता सीतेला रावणाच्या तावडीतून वाचवण्यासाठी जटायू त्याच्याशी शौर्याने लढतो. मात्र, या भीषण युद्धात तो गंभीर जखमी होतो आणि अखेर प्राण सोडतो. या प्रसंगातील जटायूचा शेवटचा संवाद प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा आहे.
‘व्हरायटी’ला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांनी या भूमिकेसाठी आवाज देताना आलेल्या आव्हानांविषयी सांगितले. त्यांच्या मते, जटायूच्या पात्रातील भावना केवळ आवाजातून व्यक्त करणे सोपे नव्हते. डबिंगच्या वेळी त्यांनी दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यासोबत जवळून काम केले. सामान्यतः डबिंग करताना कलाकारांना आधी केलेल्या अभिनयाचा संदर्भ मिळतो. मात्र, या चित्रपटात तशी परिस्थिती नव्हती. प्रभू राम आणि जटायू यांच्यातील नाते नेमके कसे दाखवायचे, याबाबत नितेश तिवारी यांची संकल्पना स्पष्ट होती.
आपल्या शेवटच्या संवादाविषयी बोलताना अनुपम खेर म्हणाले, “शेवटची ‘हे राम’ ही ओळ… मी ती किमान २०० वेळा म्हणण्याचा प्रयत्न केला असेल. कारण ती एक छोटी ओळ आहे जी प्रत्येकाने ऐकली आहे आणि म्हटली आहे. पण त्या दृश्यासाठी आवाज आणि बोलण्याची पद्धत अचूक असणे आवश्यक होते.”
जटायूच्या मृत्यूचा यशच्या मुलावरही झाला परिणाम
जटायूचा आवाज प्रभावी करण्यासाठी त्याची शारीरिक आणि भावनिक अवस्था समजून घेणेही महत्त्वाचे होते. तो एक शूर, वृद्ध आणि मरणासन्न पक्षी आहे. नुकतेच त्याने रावणासोबत भीषण युद्ध केले आहे. त्यामुळे या प्रसंगात आवाजातून वेदना, शौर्य आणि भावनिकता व्यक्त करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली. “असे काही क्षण असतात ज्यात तुम्हाला तुमचे सर्वस्व ओतावे लागते”, असेही अनुपम खेर यांनी सांगितले.
इतकेच नाही तर चित्रपटातील जटायूच्या मृत्यूचा प्रेक्षकांवर किती खोल परिणाम झाला, याचाही खुलासा त्यांनी केला. अभिनेता यशच्या मुलाने चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या वडिलांना जटायूच्या मृत्यूबद्दल प्रश्न विचारला होता. अनुपम खेर म्हणाले, “जटायूच्या मृत्यूचा भावनिक परिणाम या संपूर्ण महायुद्धात आणि चित्रपटात जाणवतो. यशच्या मुलाने त्यांना विचारले, ‘तुम्ही या पक्ष्याला का मारले?’ म्हणूनच कोणतेही पात्र इतके उत्तमरीत्या साकारणे खूप महत्त्वाचे आहे.”
Rani Chatterjee Chhath Puja: मुस्लिम असूनही दरवर्षी छठपूजा करते ही अभिनेत्री; नाव का आणि कसं बदललं?
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाचा पहिला भाग जटायूच्या मृत्यूच्या प्रसंगाने संपतो. आता दुसऱ्या भागात राम आणि हनुमान यांची भेट, त्यानंतर रावणासोबत होणारे युद्ध आणि पुढील संपूर्ण कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग २०२८ च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पहिल्या भागानंतर आता दुसऱ्या भागाबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.






