
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bigg Boss 20: सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०’ सुरू होऊन अवघे तीन दिवस झाले आहेत. मात्र, सुरुवातीपासूनच हा शो चर्चेत आला आहे. घरात दाखल झाल्यापासूनच स्पर्धकांमध्ये वाद, मतभेद आणि जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. काही स्पर्धकांनी एन्ट्री घेताच वातावरण तापवलं आहे, तर काही जणांना घरातील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या सगळ्यात एका स्पर्धकाने मात्र अवघ्या तीन दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. हा स्पर्धक म्हणजे काझी तौकीर.
‘बिग बॉस २०’मध्ये दाखल झाल्यापासून काझी तौकीर आपल्या विनोदी शैलीने, गाण्यांनी आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. त्याचा ‘मी एक रॉकस्टार बेबी आहे’ हा डायलॉग सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. काझीची ही खास स्टाईल आता सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.
याशिवाय काझी तौकीरचे छोटे-छोटे व्हिडीओ आणि रील्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये तो इतर स्पर्धकांची मस्करी करताना आणि आपल्या मजेदार अंदाजाने वातावरण हलकंफुलकं करताना दिसतो. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच त्याने ‘बिग बॉस’च्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
काझीचा हा मस्तीखोर आणि विनोदी अंदाज घरातील काही स्पर्धकांना कदाचित अतिअभिनय करणारा वाटत असला, तरी बाहेरील प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्याच्या अंदाजावर सोशल मीडियावर मजेदार मीम्सही व्हायरल होत आहेत.
कॅप्टनसी टास्कमध्ये आसिफ खानसोबत वाद
दरम्यान, नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये काझी तौकीर आणि आसिफ खान यांच्यातील वादही पाहायला मिळाला. या आठवड्यातील कॅप्टनसी टास्कदरम्यान काझी गेममध्ये यंग डीएसएला पाठिंबा देत होता. याचवेळी त्याचा आसिफ खानसोबत वाद झाला.
दोघांमधील हा वाद काही वेळातच चांगलाच वाढला. त्यामुळे घरातील इतर स्पर्धकांनाही धक्का बसला. मात्र, परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून नंतर इतर स्पर्धकांनी हस्तक्षेप करत दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला.
‘बिग बॉस २०’ला सुरुवात होऊन अवघे तीन दिवस झाले असले, तरी काझी तौकीरने आपल्या विनोदी अंदाजामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे आगामी एपिसोडमध्ये त्याचा हा मनोरंजक अंदाज किती पुढे जातो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.