
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bigg Boss 20: सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये स्पर्धकांमध्ये सतत वाद, मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. घरातील घडामोडींचे पडसाद आता घराबाहेरही उमटू लागले आहेत. अलिकडेच शोमधील अभिनेता मनीष गोयल आणि काजी तौकीर यांच्यातील वाद चर्चेत आला आहे. काजीकडून मनीषला सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होत आहे. आपल्या पतीला वारंवार टोमणे मारले जात असल्याचे पाहून अखेर मनीषची पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री पूनम नरुलाने मौन सोडले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काजी तौकीरला चांगलेच सुनावले आहे.
पूनम नरुलाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने काजी तौकीरच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पूनमच्या म्हणण्यानुसार, काजी घरात मनीषला ‘ज्ञानी बाबा’ आणि ‘प्रोफेसर’ अशा नावांनी सतत चिडवत आहे. सुरुवातीला हा प्रकार साधी मस्करी किंवा खोडसाळपणा वाटत होता. घरातील इतर सदस्यही त्यात सहभागी झाले होते. मात्र, आता या विनोदाने मर्यादा ओलांडली असून त्याचे रूप अश्लील टिप्पण्या आणि वयावरून हिणवण्यापर्यंत पोहोचल्याचे पूनमने म्हटले आहे.
‘मनीषच्या डोळ्यांत अश्रू येईपर्यंत थांबणार नाही’
मनीषला ‘प्रोफेसर’ या नावाने चिडवले जात असताना त्याला राग का आला, यामागचे कारणही पूनमने स्पष्ट केले. तिच्या पोस्टनुसार, मनीषने काजीला हा प्रकार थांबवण्यास आणि एक मर्यादा पाळण्यास सांगितले होते. मात्र, त्यावर काजीने कॅमेऱ्यासमोरच मनीषला आव्हान दिले. मनीषच्या डोळ्यांत अश्रू येईपर्यंत आपण त्याला चिडवणे थांबवणार नाही, असे काजी म्हणाल्याचा दावा पूनमने केला आहे.
तसेच मनीष स्वतःहून कधीही काजीशी वाद घालण्यासाठी पुढे जात नाही. त्याला फुटेज किंवा स्क्रीन टाइम मिळवण्याची हाव नसल्याचेही पूनमने स्पष्ट केले.
‘मनीष भावनिक आहे, पण तो ढोंग करत नाही’
पतीच्या स्वभावाबद्दल सांगताना पूनमने लिहिले की, मनीष हा कुटुंबाला महत्त्व देणारा आणि मनाने भावनिक माणूस आहे. तो कधीकधी आपली मते कठोरपणे किंवा नाट्यमय पद्धतीने व्यक्त करतो. मात्र, याचा अर्थ तो ढोंग करत आहे असा होत नाही.
काजीच्या चाहत्यांनाही पूनमने सल्ला दिला आहे. एखाद्या स्पर्धकाचे समर्थन करताना इतके आंधळे होऊ नका की दुसऱ्या व्यक्तीची बाजूच समजून घेता येणार नाही, असे तिने म्हटले आहे. मनीष खेळाला किंवा एलिमिनेशनला इतका घाबरत असता, तर त्याने काजीसाठी आपली महत्त्वाची लाईफलाइन कधीच गमावली नसती, असेही तिने नमूद केले.
पूनमने आपल्या पोस्टमध्ये मनीषच्या वयाचाही उल्लेख केला आहे. ५१ वर्षीय मनीषसारख्या साध्या आणि शांत स्वभावाच्या व्यक्तीला कोणताही अनावश्यक त्रास किंवा अपमान न होता स्वीकारले जाऊ शकत नसेल, तर ही निराशाजनक बाब असल्याचे तिने म्हटले आहे.
मनीषला हिंदी भाषेवर प्रेम असून त्याचा अभिमान आहे. तो खऱ्या आयुष्यातही स्पष्ट आणि शुद्ध हिंदी बोलतो, असे पूनमने सांगितले. शेवटी तिने प्रेक्षकांना केवळ एडिट केलेल्या फुटेजवरून मत न बनवता, एखाद्याच्या डोळ्यांतील वेदनाही समजून घेण्याचे आवाहन केले. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपले कुटुंब मनीषच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही तिने स्पष्ट केले.