(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Char Yaar Web Series: प्राइम व्हिडिओच्या आगामी हिंदी क्राइम ड्रामा मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ‘चार यार’ या मालिकेचा जागतिक प्रीमियर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून, मैत्री, महत्त्वाकांक्षा आणि गुन्हेगारी विश्वाचा थरार यांचा अनोखा संगम यात पाहायला मिळणार आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर या मालिकेची कथा रंगणार आहे.
या मालिकेत पुरव झा, नमन जैन, साकिब अय्युब आणि प्रयार्क मेहता हे मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सई ताम्हणकर, सिकंदर खेर, दिव्येंदू भट्टाचार्य, राजेश तैलंग, चंकी पांडे आणि भगवती पेरुमल हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.
‘चार यार’ ही मालिका जय, टोनी, साहिल आणि समीर या चार मित्रांची कथा सांगते. मध्यमवर्गीय जीवनातील संघर्ष, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि चांगल्या भविष्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या या मित्रांची मैत्री त्यांच्या अडचणींमुळे अधिक घट्ट होत जाते. मात्र, परिस्थिती बदलण्याच्या प्रयत्नात ते एक असा निर्णय घेतात, जो त्यांच्या आयुष्याला अनपेक्षित वळण देतो.
गरजेपोटी घेतलेला हा निर्णय त्यांना गुन्हेगारीच्या जगात ओढतो. गँगस्टर्स, पोलीस आणि सततचा पाठलाग अशा धोकादायक परिस्थितींना त्यांना सामोरे जावे लागते. परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना प्रत्येक पाऊल त्यांना नव्या संकटाच्या जवळ घेऊन जाते. अशा वेळी त्यांची मैत्रीच त्यांच्यासाठी सर्वात मोठे बळ ठरते. त्यामुळे मालिकेत मैत्रीतील भावनिक बंधांसोबतच थरारक घटनांचीही मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.
विनय वायकुळ यांचे दिग्दर्शन
‘चार यार’ या मालिकेचे दिग्दर्शन विनय वायकुळ यांनी केले आहे, तर संबित मिश्रा आणि सौरभ सावंत यांनी लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. पिंक विंडो प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली प्रणती नगरशेठ, निरज नगरशेठ आणि पी. एस. श्याम यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. बीबीसी स्टुडिओज इंडियाने विकसित केलेल्या या मालिकेची निर्मिती संकल्पना विनय वायकुळ, एस. हुसेन झैदी, संबित मिश्रा आणि सौरभ सावंत यांची आहे.
प्राइम व्हिडिओ आणि अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडियाच्या ओरिजिनल्स विभागाचे संचालक आणि प्रमुख निखिल माधोक यांनी मालिकेबद्दल सांगितले की, ‘चार यार’मध्ये मैत्री, महत्त्वाकांक्षा, विनोद आणि अनपेक्षित ट्विस्ट यांचा सुरेख मेळ आहे. तरुण कलाकारांच्या अभिनयासोबतच विनय वायकुळ यांच्या दिग्दर्शनामुळे कथेला वेगळी रंगत मिळाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
‘चार यार’चा जागतिक प्रीमियर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी केवळ प्राइम व्हिडिओवर होणार आहे. भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये ही मालिका हिंदी भाषेत पाहता येणार आहे. मैत्री, संघर्ष आणि गुन्हेगारीच्या थराराने भरलेली ही कथा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.






