
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा आगामी ‘रामायणम’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार असून, चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना चित्रपटातील कलाकार प्रमोशनच्या तयारीला लागले आहेत. अशाच एका प्रमोशनल मुलाखतीदरम्यान रणबीरने केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. एलॉन मस्कच्या हवेत उडणाऱ्या कारची तुलना त्याने थेट ‘रामायण’मधील पुष्पक विमानाशी केली आहे.
‘रामायण’च्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर, रवी दुबे, रकुल प्रीत सिंग, यश आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी ‘स्टार टॉक्स’ला मुलाखत दिली. या संवादादरम्यान होस्टने प्राचीन काळातील शस्त्रांचं कौतुक केलं. त्या काळातील शस्त्रं आजच्या अत्याधुनिक शस्त्रांनाही टक्कर देऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं. तसेच चित्रपटातील व्हीएफएक्सचंही कौतुक केलं.
या चर्चेदरम्यान एलॉन मस्कने अलीकडेच हवेत उडणारी कार लॉन्च केल्याचा उल्लेख झाला. त्यावर रणबीर कपूर म्हणाला, “नुकतंच एलॉन मस्कने हवेत उडणारी कार लॉन्च केली. पण मला वाटतं की हे तर भारताने ५ हजार वर्षांपूर्वीच केलं आहे.”
रणबीरच्या या वक्तव्याने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने एलॉन मस्कच्या फ्लाइंग कारची तुलना ‘रामायण’मधील पुष्पक विमानाशी केली. त्यानंतर सोशल मीडियावरही त्याच्या या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.
हिंदू पौराणिक कथांनुसार, पुष्पक विमानाची निर्मिती विश्वकर्मा यांनी ब्रह्मदेवासाठी केली होती. ब्रह्मदेवाने हे विमान कुबेराला दिलं होतं. मात्र, रावणाने कुबेराचा पराभव करून त्याच्याकडून पुष्पक विमान ताब्यात घेतलं, अशी कथा सांगितली जाते.
रामायणातील वर्णनानुसार, पुष्पक विमान हे एका उडत्या महालासारखं होतं. ते विचारांच्या वेगाने प्रवास करू शकत होतं आणि प्रवाशांच्या संख्येनुसार त्याचा आकार वाढू शकत होता, असं पौराणिक कथांमध्ये नमूद आहे. याच पुष्पक विमानाचा संदर्भ देत रणबीरने एलॉन मस्कच्या फ्लाइंग कारशी तुलना केली. त्यामुळे त्याचं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.