(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Phulwara Teaser:लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो घुंगरांचा आवाज, ढोलकीचा ठेका आणि अस्सल मराठी मातीचा सुगंध! ‘नटरंग’ हा चित्रपट आठवतोय का? १६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं होतं. गुणा आणि त्याची लावणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. आता तब्बल १६ वर्षांनंतर दिग्दर्शक रवी जाधव आणि झी स्टुडिओज पुन्हा एकदा लावणीच्या विश्वात घेऊन येत आहेत नवा सिनेमा. या चित्रपटाचं नाव आहे ‘फुलवरा’. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्याने सिनेरसिकांची उत्सुकता वाढवली आहे.
‘फुलवरा’चा टीझर पाहिल्यानंतर हा चित्रपट अस्सल मराठी लावणी आणि लोककलेच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याची झलक मिळते. टीझरमध्ये घुंगरांचा नाद, लावणीचे ठेके आणि पारंपरिक वातावरण पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, टीझरमध्ये अंबाबाईचा मुखवटाही दाखवण्यात आला आहे. संपूर्ण टीझरमध्ये कलाकारांचे चेहरे न दाखवता केवळ त्यांचे पाय दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाची कथा आणि कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
मकर संक्रांतीला ‘फुलवरा’ चित्रपटगृहात दाखल होणार
‘फुलवरा’ हा चित्रपट येत्या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर, म्हणजेच १४ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सणाचा मुहूर्त साधत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी ‘द फोक आख्यान’ फेम हर्ष-विजय या जोडीने सांभाळली आहे. लोकसंगीतातील वेगळ्या प्रयोगांमुळे ही जोडी सध्या चर्चेत आहे. तसेच चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गाणी ईश्वर ताराबाई अंधारे यांनी लिहिली आहेत. ‘द फोक आख्यान’मधील त्यांच्या लेखनानंतर आता ‘फुलवरा’च्या माध्यमातून ते पुन्हा एकदा लोककलेशी संबंधित विषय मांडणार आहेत.
रवी जाधव यांचा चित्रपट निर्मितीचा अनुभव आणि लोककलेचा अभ्यास असलेल्या नव्या पिढीचा सहभाग यामुळे ‘फुलवरा’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा चित्रपट केवळ लावणी आणि नृत्यापुरता मर्यादित न राहता, लावणीमागील संस्कृती, परंपरा आणि काळानुसार या लोककलेत झालेले बदलही उलगडणार का, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.






