
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
DPIFF Awards 2026: सध्या मनोरंजन विश्वात दादासाहेब फाळके पुरस्कारांची जोरदार चर्चा सुरू आहे. २० नोव्हेंबर रोजी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (DPIFF) २०२६ च्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यंदाच्या पुरस्कारांमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीसोबतच टेलिव्हिजन, संगीत, वेब सीरिज आणि आंतरराष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचाही गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ‘धुरंधर’ चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावत सोहळ्यात आपला दबदबा निर्माण केला.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘धुरंधर’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. चित्रपटातील अभिनय आणि दिग्दर्शनाचीही विशेष दखल घेण्यात आली. रणवीर सिंहने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला, तर दिग्दर्शक आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. निर्मिती क्षेत्रात आदित्य धर, ज्योती देशपांडे आणि लोकेश धर यांना सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा सन्मान मिळाला.
रणवीर सिंह, यामी गौतम आणि अक्षय खन्ना यांचाही गौरव
यंदाच्या विजेत्यांच्या यादीत अनेक लोकप्रिय कलाकारांची नावे आहेत. ‘धुरंधर’मधील अभिनयासाठी रणवीर सिंहला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. यामी गौतम धरला समीक्षकांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले, तर अक्षय खन्नाला ‘धुरंधर’मधील कामासाठी विशेष कामगिरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘सैयारा’ चित्रपटासाठी अनित पड्डाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तसेच ‘सैयारा’मधील गाण्याला वर्षातील सर्वोत्तम गाण्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
या पुरस्कारांची चर्चा होत असताना दोन्ही पुरस्कारांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. भारत सरकारतर्फे दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे. चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.
तर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (DPIFF) हा खासगी संस्थेद्वारे आयोजित केला जाणारा पुरस्कार सोहळा आहे. या माध्यमातून चित्रपट, दूरदर्शन, संगीत आणि डिजिटल मनोरंजन क्षेत्रातील योगदानाची दखल घेतली जाते. त्यामुळे नावात साधर्म्य असले तरी दोन्ही पुरस्कार वेगळे आहेत.
२० नोव्हेंबर रोजी विजेत्यांची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर कलाकारांचे चाहते आनंद व्यक्त करत असून, यंदाच्या पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची यादी मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे.