(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Taylor Swift: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (DPIFF) पुरस्कार २०२६ च्या विजेत्यांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. या यादीत अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या यादीत लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्टचे नाव पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तिला भारत सरकारकडून दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार का, असा प्रश्नही सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. मात्र, या दोन्ही पुरस्कारांमध्ये मोठा फरक आहे. नेमका काय आहे हा फरक, जाणून घेऊया.
दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानला जातो. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासात आणि योगदानात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा या पुरस्काराने गौरव केला जातो.
दुसरीकडे, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (DPIFF) हा मुंबईस्थित खासगी संस्थेद्वारे आयोजित केला जाणारा पुरस्कार सोहळा आहे. नावात साधर्म्य असले तरी या दोन्ही पुरस्कारांचे आयोजन, स्वरूप आणि अधिकृत दर्जा वेगळा आहे. त्यामुळे DPIFF पुरस्कार मिळणे आणि भारत सरकारचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत.
DPIFF पुरस्कार सोहळा यापूर्वीही वादात
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. २०२५ मध्ये मुंबई पोलिसांनी या पुरस्कार सोहळ्याचे संस्थापक आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला होता. पुरस्कारांच्या नावाचा कथित गैरवापर करणे आणि सरकारचे समर्थक असल्याचा खोटा दावा करणे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते.
शुक्रवारी जाहीर झालेल्या DPIFF पुरस्कार २०२६ च्या विजेत्यांच्या यादीत रणवीर सिंह, यामी गौतम, अक्षय खन्ना, अनित पड्डा, कमल हासन, जयदीप अहलावत यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेल्या टेलर स्विफ्टचे नावही या यादीत आहे.
यादीत टेलर स्विफ्टचे नाव पाहून अनेक चाहत्यांचा गोंधळ उडाला. तिला भारत सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणार असल्याचा काहींचा समज झाला. मात्र, तिला दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार नव्हे, तर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २०२६ प्रदान केला जाणार आहे.
त्यामुळे या दोन्ही पुरस्कारांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. केवळ नावातील साधर्म्यामुळे दोन्ही पुरस्कार एकच असल्याचा समज करून घेऊ नये.






