
फोटो सौजन्य - Social Media
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे आता हिंदी ओटीटी विश्वात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या अफलातून विनोदशैली आणि दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी मनोरंजनसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गौरवला आता प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या निर्मितीतील वेबसीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दिग्दर्शक अविनाश अरुण यांच्या ‘प्रीतम अँड पेड्रो’ या वेबसीरिजचा ३ जुलै रोजी जिओ हॉटस्टारवर प्रीमियर झाला. या मालिकेची निर्मिती राजकुमार हिरानी यांनी केली असून, त्यांचा मुलगा वीर हिरानी याच सीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. अर्शद वारसी, विक्रांत मेसी, मोना सिंह आणि बोमन इराणी यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत गौरव मोरेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
मराठी चित्रपट, रिअॅलिटी शो आणि विनोदी कार्यक्रमांमध्ये आपली छाप उमटवल्यानंतर गौरवने आता हिंदी ओटीटीकडे यशस्वी पाऊल टाकले आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयाचा नवा पैलू पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विशेष म्हणजे, या मालिकेत विक्रांत मेसी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याने सीरिजबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
गौरवने सोशल मीडियावर ‘प्रीतम अँड पेड्रो’च्या कलाकारांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. त्याच्या या पोस्टवर चाहते आणि मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
‘किल्ला’ आणि ‘थ्री ऑफ अस’सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे. दमदार कथा, अनुभवी कलाकार आणि नव्या चेहऱ्यांचा संगम असलेली ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही वेबसीरिज प्रेक्षकांची पसंती मिळवते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.