फोटो सौजन्य - Social Media
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांनी आपल्या दिग्दर्शन कारकिर्दीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. जवळपास पाच दशकांच्या प्रदीर्घ प्रवासात ४७ चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर आता ते पुन्हा कधीही दिग्दर्शकाची धुरा सांभाळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, निर्माता म्हणून चित्रपट आणि नाट्यनिर्मितीत सक्रिय राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. बदलत्या काळात चित्रपट निर्मितीच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट यांना पुन्हा दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ठामपणे, “नाही,” असे उत्तर दिले. आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, “आज चित्रपटांचा आशय आणि दिशा आधीच निश्चित केलेली असते. ठरावीक चौकटीत राहून कंटेंट तयार करण्याचा दबाव वाढला आहे. अशा परिस्थितीत कलाकाराच्या सर्जनशीलतेला किती वाव उरतो, हा मोठा प्रश्न आहे.” सध्याच्या चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकाला स्वतंत्रपणे विचार मांडण्याची संधी कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
तरीही हिंदी चित्रपटसृष्टीबाबत ते निराश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आजही चांगल्या आणि अर्थपूर्ण कथा सांगण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१९७४ मध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलेल्या महेश भट्ट यांनी ‘अर्थ’, ‘सारांश’, ‘आशिकी’ यांसारखे अनेक गाजलेले आणि अजरामर चित्रपट दिले. त्यांच्या चित्रपटांमध्ये वैयक्तिक अनुभव, सामाजिक वास्तव आणि नातेसंबंधांचे प्रभावी चित्रण पाहायला मिळाले. भाऊ मुकेश भट्ट यांच्यासोबत त्यांनी ‘विशेष फिल्म्स’ची स्थापना केली. या बॅनरखाली ‘राज’, ‘मर्डर’ आणि ‘जिस्म’सारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती झाली. इतकेच नव्हे, तर अनुपम खेर, कंगना रणौत आणि इमरान हाश्मी यांसारख्या अनेक कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी संधी देण्याचे श्रेयही महेश भट्ट यांनाच जाते.
महेश भट्ट यांची कन्या आलिया भट्ट आज बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर तिने ‘हायवे’, ‘उडता पंजाब’, ‘राजी’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘डार्लिंग्स’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ यांसारख्या चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या. २०२२ मध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत विवाह केल्यानंतर त्यांना राहा कपूर ही कन्या झाली. नुकतीच ती ‘अल्फा’ या महिला-केंद्रित अॅक्शन थ्रिलर चित्रपटात झळकली.






