
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Gondhal Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक संतोष दावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्यानंतर आता आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘केजीएफ’, ‘कांतारा’ आणि ‘सालार’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या होम्बळे फिल्म्सने ‘गोंधळ’च्या आंतरराष्ट्रीय वितरणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे हा चित्रपट परदेशातील चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित होणार असून, मराठी चित्रपटाला जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
‘गोंधळ’ हा मराठी लोकपरंपरा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील सांस्कृतिक वातावरणावर आधारित थ्रिलर चित्रपट आहे. संतोष दावखर यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी आणि निषाद भोईर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ज्येष्ठ संगीतकार इलैयाराजा यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.
ग्रामीण महाराष्ट्रात रात्रीच्या वेळी पार पडणाऱ्या पारंपरिक विधींच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा उलगडते. श्रद्धा, मानवी महत्त्वाकांक्षा, सत्ता आणि विश्वासघात अशा विषयांची गुंफण या कथेत पाहायला मिळते. अस्सल सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि रहस्यमय कथानकामुळे ‘गोंधळ’ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका
‘गोंधळ’ने आपल्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ९९व्या अकादमी पुरस्कारांमध्ये अर्थात ऑस्कर २०२७ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ या श्रेणीसाठी या चित्रपटाची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्याचे वृत्त आहे. याआधी चित्रपटाला ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
या यशामुळे ‘गोंधळ’ची चर्चा केवळ मराठी चित्रपटसृष्टीपुरती मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. आता होम्बळे फिल्म्सच्या वितरणामुळे चित्रपटाला परदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची नवी संधी मिळणार आहे.
होम्बळे फिल्म्सने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ‘गोंधळ’च्या आंतरराष्ट्रीय वितरणाची घोषणा केली. पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटापासून ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका होण्यापर्यंतचा ‘गोंधळ’चा प्रवास अभिमानास्पद असल्याचे संस्थेने म्हटले आहे. ही दमदार कथा जगभरातील प्रेक्षकांसमोर आणताना आनंद होत असल्याचेही कंपनीने नमूद केले.
होम्बळे फिल्म्सने ‘केजीएफ’ फ्रँचायझी, ‘कांतारा’, ‘सालार’ फ्रँचायझी आणि ‘महावतार नरसिंह’ यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून ‘गोंधळ’ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवी संधी मिळणार आहे.
मराठी चित्रपटासाठी महत्त्वाची संधी
मराठी भाषा, लोकपरंपरा आणि ग्रामीण संस्कृती यांचे दर्शन घडवणाऱ्या ‘गोंधळ’ला आता जागतिक प्रेक्षकांसमोर सादर केले जाणार आहे. ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड आणि होम्बळे फिल्म्सचे आंतरराष्ट्रीय वितरण या दोन्ही घडामोडींमुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाच्या परदेशातील प्रदर्शनाच्या तारखा आणि देशांबाबतची अधिक माहिती अद्याप जाहीर होणे बाकी आहे.
‘गोंधळ’च्या या जागतिक प्रवासामुळे मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत.
Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?