
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Shefali Bagga: टेलिव्हिजन स्पोर्ट्स प्रेझेंटर आणि ‘बिग बॉस’ फेम शेफाली बग्गा सध्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केलेल्या तपासादरम्यान शेफालीने १.२० कोटी रुपये जमा केल्याची माहिती समोर आली आहे. महादेव बेटिंग ॲपच्या कथित प्रमोशनमधून मिळालेली रक्कम तपास यंत्रणेकडे परत केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर शेफालीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना शेफालीने सांगितले की, अनेक सेलिब्रिटी आणि सार्वजनिक व्यक्तींप्रमाणेच तिचे काम सोशल मीडियावर काही ब्रँड्सचा प्रचार करण्यापुरते मर्यादित होते. संबंधित ब्रँड्स किंवा इतर संस्थांच्या कामकाजात तिचा कोणताही सहभाग नव्हता, असेही तिने स्पष्ट केले.
शेफाली म्हणाली की, तिने तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले आहे आणि संबंधित पैसे परत केले आहेत. तसेच, भारतीय कायद्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही तिने सांगितले.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात शेफालीवर काय आरोप?
अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्रानुसार, महादेव बेटिंग ॲप सिंडिकेटसाठी प्रचारात्मक व्हिडीओ तयार करण्याच्या बदल्यात शेफालीने अंदाजे १.५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान तिने १.२० कोटी रुपये जमा केल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय, दिल्लीतील तिच्या घराच्या झडतीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी ३० लाख रुपये रोख जप्त केल्याचे वृत्त आहे. या कारवाईनंतर शेफाली बग्गाचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
मात्र, या प्रकरणातील आरोप आणि तपासाचे निष्कर्ष यांत फरक असून, आरोपांवरूनच कोणालाही दोषी ठरवता येत नाही.
Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’च्या OTT रिलीजची तारीख ठरली? जाणून घ्या अपडेट
महादेव बुक या नावानेही ओळखले जाणारे महादेव बेटिंग ॲप हे कथित अवैध ऑनलाइन सट्टेबाजी नेटवर्क आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे क्रिकेट आणि फुटबॉलसारख्या खेळांवर ऑनलाइन सट्टेबाजी चालवली जात असल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे.
या नेटवर्कच्या तपासादरम्यान अनेक व्यक्ती आणि सेलिब्रिटींच्या कथित सहभागाची चौकशी करण्यात आली आहे. ईडी या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा तपास करत आहे.
दरम्यान, शेफाली बग्गाने आपण नकळतपणे ब्रँडचा प्रचार केल्याचे सांगत तपासात सहकार्य केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपास आणि अधिकृत माहिती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक