( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Govinda Controversy: अभिनेता गोविंदा सध्या आपल्या आगामी ‘रूपा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून तो पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. मात्र, चित्रपटासोबतच गोविंदा आणि त्याची सहकलाकार कोमल राणी स्वर्णकर यांच्या नात्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. दोघांच्या वयातील मोठ्या फरकावरूनही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या सगळ्या चर्चांदरम्यान अभिनेत्री सोमी अली गोविंदाच्या समर्थनार्थ पुढे आली आहे.
गोविंदा आणि कोमल राणी नुकतेच ‘रूपा’च्या प्रमोशनसाठी विमानतळावर एकत्र दिसले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
सुनीता यांनी गोविंदासोबत कोमल राणीला पाहून नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “चित्रपट नसतानाच तो चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. मी काय म्हणू शकते? तो आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीला सोबत घेऊन फिरत आहे. त्याला लाज वाटायला हवी. काहीतरी दर्जा असायला हवा.”
सुनीता यांच्या या वक्तव्यानंतर गोविंदा आणि कोमल राणी यांच्या वयातील फरकाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
View this post on Instagram
या वादात आता अभिनेत्री सोमी अलीने गोविंदाची बाजू घेतली आहे. तिने सोशल मीडियावर गोविंदासोबतचे काही जुने फोटो शेअर करत त्याच्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं.
सोमी अलीने लिहिलं, “मला इथे माझं मत मांडायचं आहे, कारण दुसरं कोणीही ते मांडणार नाही. गरज पडल्यास मी नक्कीच माझा पाठिंबा दर्शवेन. मी गोविंदाला वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही स्तरांवर ओळखते, त्यामुळे मी त्याच्याबद्दल दोन्ही दृष्टिकोनातून बोलू शकते.”
सोमी अलीने गोविंदाच्या अभिनयाचं कौतुक करत त्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक म्हटलं. ती म्हणाली, “चिची ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम प्रतिभावंतांपैकी एक आहे आणि इंडस्ट्रीतील माझ्या कारकिर्दीत भेटलेल्या सर्वात नम्र कलाकारांपैकी एक आहे.”
तिने पुढे गोविंदा आणि सुनीता आहुजा या दोघांबद्दलही आपल्या मनात प्रचंड आदर असल्याचं सांगितलं.
‘तरुण अभिनेत्रीसोबत काम करण्यात काहीही चुकीचं नाही’
गोविंदाच्या कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर होत असलेल्या टीकेवर सोमी अलीने स्पष्ट मत मांडलं. “केवळ वयामुळे एखाद्या अभिनेत्याने तरुण अभिनेत्रीसोबत भूमिका स्वीकारण्यात काहीही चुकीचं नाही,” असं तिने म्हटलं.
सोमी पुढे म्हणाली, “प्रतिभेला कोणतीही अंतिम मुदत नसते. जेव्हा काम मिळणं कठीण असतं, तेव्हा काम करत राहण्याचा निर्णय हा आदरास पात्र असतो, त्याची चेष्टा केली जाऊ नये.”
सोमी अलीने कलाकाराच्या वयापेक्षा त्याची प्रतिभा आणि व्यावसायिकता महत्त्वाची असल्याचंही सांगितलं. “एखाद्या अभिनेत्याचं मूल्य त्याच्या वयावरून किंवा त्याच्या सहकलाकारांच्या वयावरून ठरवलं जात नाही. ते त्यांच्या प्रतिभेवरून, व्यावसायिकतेवरून आणि पुढे जात राहण्याच्या इच्छेवरून ठरवलं जातं,” असं तिने म्हटलं.
तसंच, जेव्हा एखाद्या कलाकाराला कामाच्या संधी कमी मिळतात, तेव्हा मिळालेल्या दुसऱ्या संधीचा आनंद साजरा केला पाहिजे, असंही सोमीने सांगितलं. प्रत्येक कलाकाराला त्यांच्याकडे अजूनही काहीतरी मौल्यवान देण्यासारखं आहे, हे सिद्ध करण्याची संधी मिळायला हवी, अशी भूमिका तिने मांडली.
गोविंदा आणि सोमी अलीने एकत्र केलंय काम
सोमी अली आणि गोविंदा यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. ‘आंदोलन’ आणि ‘अग्निचक्र’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र अभिनय केला होता. त्यामुळे गोविंदाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची आपल्याला चांगली माहिती असल्याचं सोमीने आपल्या पोस्टमधून सांगितलं आहे.