(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Ananya Raj Death:बॉलिवूड अभिनेत्री अनन्या राज हिचं वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या निधनाची माहिती दिली. अनन्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर तिचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे.
अनन्या राजने काही बॉलिवूड चित्रपटांसोबतच अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केलं होतं. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. सोशल मीडियावरही ती सक्रिय होती. मात्र, मागील काही काळापासून ती सोशल मीडियापासून दूर होती.
अनन्याचा जन्म २२ ऑक्टोबर १९९८ रोजी झाला होता. मुंबईत वाढलेल्या अनन्याने लहान वयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
अनन्या राज २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘7 Hours to Go’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर २०१७ मध्ये आलेल्या ‘The Final Exit’ या चित्रपटातून तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. २०१९ मध्ये ती ‘Ghost’ या चित्रपटातही दिसली होती.
चित्रपटांसोबतच तिने विविध म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केलं होतं. तिच्या अभिनयामुळे आणि सोशल मीडिया उपस्थितीमुळे तिचा एक चाहतावर्गही तयार झाला होता.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्या गेल्या वर्षभरापासून मानसिक आणि शारीरिक समस्यांशी झुंज देत होती. तिचं १५ जुलै रोजी निधन झालं. मात्र, अभिनेत्रीच्या निधनाची माहिती कुटुंबीयांनी त्यानंतर जवळपास एका महिन्याने चाहत्यांसोबत शेअर केली.
कुटुंबीयांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अनन्या आता आपल्यात नसल्याचं सांगितलं. ही बातमी समोर येताच चाहत्यांनी तिचे जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तिला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.
अनन्याच्या कुटुंबीयांनी तिच्यासाठी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनन्याच्या फोटोसमोर मोठ्या प्रमाणात फुलं ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. तसंच जवळच हवनकुंडही पाहायला मिळत आहे.
अनन्याच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये तिचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्रांनी शोक व्यक्त केला आहे. अवघ्या २७व्या वर्षी अभिनेत्रीच्या निधनाने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.