(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Khatron Ke Khiladi 15 Winner: टीव्हीवरील लोकप्रिय आणि थरारक स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 15’चा ग्रँड फिनाले रविवारी 4 ऑक्टोबरला पार पडला. संपूर्ण सीझनमध्ये एकापेक्षा एक धोकादायक स्टंट करत स्पर्धकांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अखेर अभिनेता अविनाश मिश्रा याने आपल्या धाडसी कामगिरीच्या जोरावर या सीझनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.
ग्रँड फिनालेमध्ये अविनाशने तगडे स्पर्धक ऋत्विक धनजानी आणि सोशल मीडिया स्टार ओरी यांना मागे टाकत विजेतेपदाची चमकदार ट्रॉफी पटकावली. त्याच्या विजयानंतर चाहत्यांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रोहित शेट्टीच्या सूत्रसंचालनाखाली पार पडलेल्या ‘खतरों के खिलाडी 15’च्या ग्रँड फिनालेमध्ये अविनाश मिश्रा याला विजेता घोषित करण्यात आलं. विजेतेपदासोबतच त्याला ट्रॉफी, २० लाख रुपयांची बक्षिसाची रक्कम, नवी कोरी कार आणि युरोप ट्रिप असं बक्षीस मिळालं.
दरम्यान, ऋत्विक धनजानी हा पहिला रनरअप, तर ओरी दुसरा रनरअप ठरला.
केपटाऊनमध्ये रंगला थरारक सीझन
‘खतरों के खिलाडी 15’चं चित्रीकरण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये करण्यात आलं होतं. यंदाच्या सीझनमध्ये ‘चॅम्पियन्स विरुद्ध चॅलेंजर्स’ असं खास स्वरूप पाहायला मिळालं. जुन्या दिग्गज स्पर्धकांसमोर नव्या खेळाडूंनी आव्हान उभं केलं होतं.
उंचावरून केले जाणारे स्टंट, पाण्यातील थरारक टास्क आणि अवजड यंत्रांशी संबंधित आव्हानांचा या सीझनमध्ये समावेश होता. अविनाशने संपूर्ण सीझनमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत एकही टास्क सोडला नाही. पाण्याखाली पार पडलेल्या एका महत्त्वाच्या स्टंटमध्ये त्याने करण वाहीला मागे टाकत सीझनचा पहिला फायनलिस्ट होण्याचा मान मिळवला होता.
यानंतरही त्याने आपली दमदार कामगिरी कायम ठेवली आणि अखेर ‘खतरों के खिलाडी 15’च्या विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावे केली.
#AvinashMishra Winning Moment. #KhatronKeKhiladi15 https://t.co/IifzIB4IDz — Khabri 👂 (@real_khabri_1) October 4, 2026
विजेता म्हणून नाव जाहीर होताच अविनाश मिश्रा भावुक झाला. या शोमध्ये स्वतःला सिद्ध करण्याच्या उद्देशाने सहभागी झालो होतो, मात्र संपूर्ण प्रवासात स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलो, अशी भावना त्याने व्यक्त केली.
अविनाशसाठी ही ट्रॉफी केवळ एक पुरस्कार नसून स्वतःवरील विश्वासाचं प्रतीक आहे. गेल्या दहा वर्षांत त्याला विविध भूमिकांसाठी नामांकन मिळालं आणि अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये तो सहभागी झाला. मात्र, पहिल्यांदाच एखादा पुरस्कार जिंकता आल्याने ‘खतरों के खिलाडी 15’चं विजेतेपद त्याच्यासाठी विशेष असल्याचं त्याने सांगितलं.
ट्रॉफी जिंकल्यानंतर ईशा सिंहला मारली मिठी
विजेतेपदाची घोषणा होताच अविनाशच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ट्रॉफी हातात घेतल्यानंतर तो प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्याच्या जवळच्या मैत्रीण आणि अभिनेत्री ईशा सिंहकडे धावत गेला.
अविनाशने ईशाला घट्ट मिठी मारली आणि दोघांनीही या खास क्षणाचा आनंद साजरा केला. यावेळी ईशाच्या डोळ्यांतही आनंदाश्रू पाहायला मिळाले.
‘खतरों के खिलाडी 15’च्या प्रवासात अविनाशने केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे, तर एक सक्षम आणि धाडसी स्पर्धक म्हणूनही स्वतःला सिद्ध केलं. जिद्द, आत्मविश्वास आणि दमदार स्टंटच्या जोरावर त्याने इतर स्पर्धकांवर मात करत अखेर सीझनच्या विजेतेपदाचा मान मिळवला.






