संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता निवडणूक आयोगाच्या नावाने व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून एसआयआरमध्ये नाव जुळत नसल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ९ लाख ९२ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना १५ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत वडगाव खुर्द येथे घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून, ते वडगाव खुर्द येथे राहतात. १५ ऑगस्ट रोजी सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपद्वारे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या नावाने मेसेज पाठविला. तक्रारदारांच्या वडिलांचे नाव एसआयआरमध्ये जुळत नसल्याचे सांगून त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर बँक खात्याचा तपशील घेऊन पैसे वर्ग करण्यास सांगण्यात आले. तसेच मेसेज आणि ओटीपी शेअर करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यातून ९ लाख ९२ हजार रुपये परस्पर वर्ग करण्यात आले. पोलिस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करीत आहेत.
वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने ४.७३ लाखांची फसवणूक
वर्क फ्रॉम होम जॉबच्या नावाखाली सुरुवातीला किरकोळ परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर नवीन कुमार कुष्णप्पा यांची ४ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. टेलिग्रामवर लिंक पाठवून अकाऊंट तयार करण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला परतावा दिल्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांत रक्कम वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. १७ ते १९ जुलैदरम्यान हा प्रकार घडला आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस निरीक्षक राऊत तपास करीत आहेत.






